WIND vs WSA: टीम इंडियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, दक्षिण आफ्रिकेवर 4 धावांनी मात

India Women vs South Africa Women 2nd ODI: टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

WIND vs WSA: टीम इंडियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, दक्षिण आफ्रिकेवर 4 धावांनी मात
wind vs wsa 2nd odi
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 19, 2024 | 10:41 PM

वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सनसनाटी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेला 326 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 11 आणि शेवटच्या चेंडूत 6 धावांची गरज होती. मात्र पूजा वस्त्राकर हीने शानदार पद्धतीने या 10 धावांचा बचाव केला आणि टीम इंडियाने हा थरारक झालेला सामना 4 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 321 धावाच करता आल्या. कॅप्टन लॉरा वोल्वार्ड आणि मारिझान कॅप या दोघींनी शतकं ठोकून टीमला विजयाजवळ आणून ठेवलं. मात्र या दोघींची खेळी व्यर्थ गेली. टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेची 326 धावांचा पाठलाग करताना खास सुरुवात राहिली नाही. दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 67 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड आणि मारिझान कॅप या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान मारिझान काप हीने शतक ठोकलं. मात्र त्यानंतर मारिझान 114 धावांवर बाद झाली. त्यानंतर नादीने डी क्लेर्क हीच्यासह लॉरा वोल्वार्ड हीने पाचव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला होता. पूजा वस्त्राकर हीला 11 धावांचा बचाव करायचा होता. तर कॅप्टन लॉरा सेट होती. मात्र पूजाने शेवटच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर नादीने डी क्लेर्क हीला 28 धावांवर आऊट करत दश्रिण आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. त्यानंर पुढील बॉलवर पूजाने नॉन्डुमिसो शांगासे हीला गोल्डन डक आऊट केलं.

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या बॉलवर विजयासाठी 5 धावांची गरज होती. मात्र स्ट्राईकवर नवीन खेळाडू होता. पूजाने चलाखीने बॉल टाकला आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला. कॅप्टन लोरा 135 धावांवर नाबाद राहिली, मात्र त्या धावांचा काहीच उपयोग झाला नाही. अखेरच्या क्षणी झटपट 2 विकेट्स गमावल्याने खऱ्या अर्थाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. टीम इंडियाकडून पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर स्मृती मंधाना आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना.

दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.