पंचाचा निर्णय बदलण्यासाठी रोहित शर्माने केली अशी खेळी, रिव्ह्यू गमावला तरी झाला असा फायदा

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम गोलंदाजी करावी लागली. अपेक्षेप्रमाणे श्रीलंकेने 50 षटकात 8 गडी गमवून 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावा दिल्या. पहिल्या सामन्यात एका धावेने सामना बरोबरीत सुटला होता. पण यावेळी रोहित शर्माने ती एक धाव वाचवली. कशी ते जाणून घ्या

पंचाचा निर्णय बदलण्यासाठी रोहित शर्माने केली अशी खेळी, रिव्ह्यू गमावला तरी झाला असा फायदा
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 04, 2024 | 7:46 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 240 धावा केल्या आणि 241 धावांचं आव्हान दिलं. कदाचित रोहित शर्माने डोकं लावलं नसतं तर हे आव्हान 242 असू शकलं असतं. आता एका धावेने काय फरक पडतो असं तुम्हाला वाटत असेल तर पहिला सामना डोळ्यासमोर आणा. फक्त एका धावेमुळे हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे रोहित शर्मासारखा अनुभवी कर्णधार मैदानात असेल तर तो उगाच एक धाव जाऊ देईल का? त्यामुळे रोहित शर्माच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या एका अपीलने पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडलं. नेमकं काय झालं? ते समजून घ्या. श्रीलंकेचा डाव सुरु असताना शेवटचं षटक कर्णधार रोहित शर्माने अर्शदीप सिंगच्या हाती सोपवलं.

अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर कामिंदु मेंडिसने 1 धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर धनंजयाने 1 धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर कामिंदुने चौकार मारला. चौथा चेंडू पंचांनी वाइट घोषित केला. पण इथेच रोहित शर्माने आपल्या डोक्याचा वापर केला. खरं तर चेंडू लेग साईडने फलंदाजाला किंचितसा घासून गेला होता. पंचांना हा आवाज आला नाही. त्यामुळे त्यांनी वाइड दिला. पण रोहित शर्माला हा आवाज आला होता. क्षणाचाही विलंब न करता रोहित शर्माने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. त्यानंतर लगेचच रिव्ह्यू घेतला. त्यात चेंडू ग्लव्हजला घासून गेल्याचं दिसलं. तेव्हा तिसऱ्या पंचांनी वाइड मागे घेण्यास फिल्डवरच्या पंचांना सांगितलं. त्यामुळे रिव्ह्यू वाया गेला पण एक धाव वाचली.

आयपीएलप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामन्यात वाइडसाठी रिव्ह्यू घेता येत नाही. त्यामुळे एलबीडब्ल्यूचं अपील केलं. तसं पण शेवटचं षटक असल्याने रिव्ह्यू ठेवून तरी काय करणार? असाही प्रश्न होता. त्यामुळे रोहित शर्माचा रिव्ह्यू नेमका कशासाठी आहे हे इतर खेळाडूंना माहिती होतं. त्यामुळे रोहित शर्माने एक धाव वाचवण्यासाठी रिव्ह्यू गमावणं योग्य असल्याचं जाणलं. त्याच्या या निर्णयाचं भारतीय क्रीडाप्रेमी कौतुक करत आहे. एक धाव किती महत्त्वाची असते याची जाणीव पहिल्या सामन्यात झाली आहे.