
टी 20i आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकल्यानंतर आता टीम इंडियाची मायदेशात कसोटी पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीअंतर्गत होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील कसोटी सामन्यांमधील कामगिरी कशी राहिली आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज हे संघ एकूण 100 वेळा आमनेसामने आले आहेत. वेस्ट इंडिजने टीम इंडियाच्या तुलनेत 100 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने 30 सामन्यांमध्ये भारताला पराभूत केलं आहे. तर भारतीय संघाने विंडीजवर 23 वेळा पलटवार केला आहे. तर उभयसंघातील 47 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 25 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. उभयसंघातील पहिली मालिका ही 1948-49 साली खेळवण्यात आली. त्यानंतर विंडीजने सलग 5 कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला. तर भारताला विंडीज विरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी 1970-71 पर्यंत प्रतिक्षा करावी लागली. भारताने 1970-71 साली 5 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर उभयसंघात काही मालिकांमध्ये बरोबरीची लढाई पाहायला मिळाली. मात्र गेल्या काही दशकांमध्ये विंडीजवर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे.
विंडीजने टीम इंडिया विरुद्ध शेवटची कसोटी मालिका 2002 साली जिंकली होती. तेव्हापासून विंडीजला टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. उभयसंघात 2002 पासून ते 2023 पर्यंत एकूण 9 कसोटी मालिका खेळवण्यात आल्यात. टीम इंडियाने सलग 9 कसोटी मालिकांमध्ये विंडीजला पराभूत केलं आहे. त्यामुळे तुलनेत विंडीजने जरी जास्त सामने जिंकले असले तरी गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ टीम इंडिया विंडीजवर वरचढ असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.
दरम्यान विंडीज 7 वर्षांनंतर भारतात आली आहे. विंडीज याआधी अखेरीस 2018 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा भारताने विंडीजचा 2 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली आणि विंडीज विरुद्ध सलग दहावी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.