
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 4 दिवसांचे 2 सराव सामने खेळवण्यात येत आहे. इंडिया ए ला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पराभूत व्हावं लागलं. तर दुसरा आणि अंतिम सामना हा 7 नोव्हेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येत आहे. इंडिया ए ने पहिल्या डावात 57.1 षटकांमध्ये 161 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया ए ने प्रत्युत्तरात 2 विकेट्स गमावून 53 रन्स केल्या आहेत. या दरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. एक महत्त्वाचा खेळाडू या सामन्यातून बाहेर झाला आहे.
ऑस्ट्रेलिया ए ला या सामन्यादरम्यान झटका लागला आहे. वेगवान गोलंदाज मायकल नेसर याला दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. याच मायकल नेसर याने इंडिया ए ला पहिल्या डावात गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. नेसरने 27 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मात्र आता तो या सामन्यातून बाहेर पडला आहे. नेसरला त्याच्या कोट्यातली 13 व्या ओव्हरमध्ये त्रास जाणवला. त्यामुळे नेसरला लंगडत लंगडत मैदानाबाहेर जावं लागलं. नेसरला हॅमस्ट्रिंगमुळे या सामन्यात खेळता येणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नेसरला किती त्रास होतोय याचा अंदाज घेऊन आवश्यक उपचार केली जाणार आहेत. नेसरला 23 ऑक्टोबरला झालेल्या एका सामन्यातही हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास जाणवला होता.
इंडियाविरुद्ध पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत नेसरला संधी मिळण्याची शक्यता नाही, कारण स्कॉट बोलँड हा 13 सदस्यीय संघात एकमेव बॅकअप खेळाडू असू शकतो. मात्र नेसरची मालिकेदरम्यान कधीही गरज पडू शकते. मात्र नेसरला झालेली दुखापत ही ऑस्ट्रेलियासाठी झटका आहे.
ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग इलेव्हन : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, ऑलिव्हर डेव्हिस, जिमी पीअरसन (विकेटकीपर), मायकेल नेसर, नॅथन मॅकअँड्र्यू, स्कॉट बोलँड आणि कोरी रोचिचिओली.
इंडिया ए प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, साई सुदर्शन, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, तनुष कोटियन, खलील अहमद, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार.