IPL 2023 सुरू होण्याआधी मोठी अपडेट, एस. श्रीशांतची आयपीएलमध्ये एन्ट्री, देण्यात आली मोठी जबाबदारी

| Updated on: Mar 21, 2023 | 8:55 PM

2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या एस श्रीशांतची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. यंदाच्या हंगामात त्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

IPL 2023 सुरू होण्याआधी मोठी अपडेट, एस. श्रीशांतची आयपीएलमध्ये एन्ट्री, देण्यात आली मोठी जबाबदारी
Follow us on

मुंंबई : आयपीएल 2023स्पर्धेतील पहिला सामना गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 31 मार्चला थराराला सुरूवात होणार आहे. यंदाच्या मोसमाला सुरूवात होण्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या एस श्रीशांतची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. यंदाच्या हंगामात त्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

IPL 2023 चे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने कॉमेंट्री पॅनलची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचाही समावेश करण्यात आला आहे. एस श्रीशांत पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. त्यासोबत टी-20 वर्ल्ड कप विजेते संघाचे माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड आणि अॅरॉन फिंच आणि इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यांचाही समावेश आहे.

कॉमेंट्री पॅनेलमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये लिटल मास्टर सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, इरफान पठाण, मुरली विजय, लक्ष्मीपती बालाजी, सुब्रमण्यम बद्रीनाथ, संदीप पाटील आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचाही समावेश असणार आहे.

श्रीशांत आयपीएल 2013 च्या मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. राजस्थान रॉयल्स संघात असताना श्रीशांतला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राजस्थानमधील अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांचाही सहभाग होता. बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंदी घातली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने श्रीशांतला आरोपातून मुक्त केलं आहे.

दरम्यान, श्रीशांतने 2005 मध्ये नागपुरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2007 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकचा झेल घेतल्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली होती. नंतर 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता.