
आयपीएल स्पर्धेत 200 पार धावसंख्या गाठणं तसं काही सोपं नसतं. त्यात समोर चेन्नई सुपर किंग्ससारखा तगडा संघ असताना तर जवळपास अशक्यप्राय असतं. पण लखनौ सुपर जायंट्सने ही किमया साधली आहे. चेन्नईचं होमग्राउंड असलेल्या चेपॉकवर सुपर किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या होत्या. विजयासाठी दिलेल्या 211 धावा लखनौ सुपर जायंटने 19.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केल्या. चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयात मार्कस स्टोयनिसची नाबाद 124 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. शेवटपर्यंत उभा राहून त्याने हा सामना जिंकून दिला. या विजयामुळे लखनौ सुपर जायंट्सने टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. या सामन्यातील विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल खूश दिसला. सामन्यानंतर त्याने या विजयाचं विश्लेषण केलं.
“हा सामना खरंच खूप खास होता. आम्ही फलंदाजी करत असताना हा सामना खूपच मागे पडला होता. त्यामुळे हातून निसटलेला सामन्यात विजय मिळवणं खरंच खास असतं. त्यांनी आमच्यावर दबाव आणला होता. येथे खरंतर 170-180 ही धावसंख्या मोठी ठरली असती. पण या विजयाचं सर्व श्रेय हे मार्कस स्टोयनिसला..कारण नुसतं पॉवर हिटिंग नव्हती तर प्रत्येक चाल डोक्याने खेळत होता. त्याने गोलंदाजाची निवड करून फटकेबाजी केली.” असं लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने सामन्यानंतर सांगितलं.
“स्टोयनिसला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून पॉवरप्लेचा फायदा घेण्याचा हेतू होता. कारण टॉप 3 मध्ये एक पॉवर हिटर असायला हवा. गेल्या काही वर्षात टी20 क्रिकेट बदललं आहे. तुम्हाला पॉवर प्लेमध्ये चांगली खेळी करणं आवश्यक असतं. त्यात इम्पॅक्ट प्लेयरमुळे या खेळाला अधिक खोली आली आहे.”, असं केएल राहुलने सामन्यानंतर सांगितलं.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.