
बीसीसीआयकडून रविवारी 16 फेब्रुवारीला आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या हंगामातील सलामीचा सामना हा 22 मार्चला खेळवण्यात येणार आहे. तर आयपीएलमध्ये 5 वेळा चॅम्पियन्स राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना हा 23 मार्चला होणार आहे. मुंबईसमोर या पहिल्याच सामन्यात चेन्नईचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील हा सामना चेपॉक स्टेडियममध्ये होणार आहे. तर मुंबई आपला घरच्या मैदानातील अर्थात वानखेडे स्टेडियममधील पहिला सामना हा 31 मार्चला खेळणार आहे. मुंबई घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात कोलकाताविरुद्ध भिडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. मुंबई या हंगामात वानखेडे स्टेडियममध्ये किती सामने खेळणार आहे? हे जाणून घेऊयात.
मुंबई वानखेडे स्टेडियमधील दुसरा सामना हा लखनऊविरुद्ध 4 एप्रिलला खेळणार आहे. तर पलटण वानखेडेतील तिसऱ्या सामना हा बंगळुरुविरुद्ध भिडणार आहे. हा सामना 7 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर हार्दिकसेना 10 दिवसांनी पुन्हा एकदा वानखेडेत खेळण्यासाठी उतरणार आहे. मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात 17 एप्रिलला थरार रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यानंतर मुंबईचा वानखेडेतील सामना हा 6 मे रोजी खेळवण्यात येईल. मुंबई 6 मे ला गुजरातविरुद्ध खेळेल.
मुंबई या हंगामातील वानखेडे स्टेडियममधील शेवटचा सामना हा 6 मे रोजी असणार आहे. मुंबई या सामन्यात दिल्ली विरुद्ध भिडणार आहे. हा सामनाही संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तसेच या हंगामातील सलामीचा आणि अंतिम सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. या हंगामात एकूण 10 संघांमध्ये 13 शहरात 65 दिवसांत 74 सामने खेळवण्यात येणार आहेत.
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चाहर, विल जॅक्स, नमन धीर, मुजीब उर रहमान, (दुखापतग्रस्त अल्लाह गजनफर याच्या जागी समावेश), मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, लिज्जाड विलियम्स, रीस टॉप्ली, रॉबिन मिंझ, कर्ण शर्मा, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॅकब्स, वी सत्यनारायण, राज अंगद बावा, केएल श्रीजीत आणि अश्वनी कुमार .