CSK चा आणखी एक मोठा डाव! स्पिनर म्हणून गाजवली कारकीर्द, आता बॅटिंग कोचची भूमिका? झहीर खानच्या खास मित्राची चेन्नईत एन्ट्री होणार!
Gareth Batty CSK News: इंग्लंडचा माजी फिरकीपटू झहीर खानच्या स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सीएसकेमध्ये सामील होणार आहे. सीएसकेने याबाबत माहिती दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर आता त्यांचे जवळचे मित्रही या फ्रँचायझीमध्ये सामील होणार आहेत. इंग्लंडचे माजी फिरकीपटू गॅरेथ बॅटी सीएसकेमध्ये सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बॅटी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात. ४९ वर्षीय बॅटी यांचे चेन्नईचे नवीन मुख्य प्रशिक्षक झहीर खान यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. हे दोघे वॉर्सेस्टरशायरमध्ये एकत्र खेळले होते.
सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत. चर्चा सुरू असून येत्या काही दिवसांत घोषणा अपेक्षित आहे. गॅरेथ बॅटी सध्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सरे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी सरे संघाला सलग तीन चॅम्पियनशिप विजेतेपदे मिळवून दिली, मात्र गेल्या वर्षी संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.
त्यांच्या कार्यकाळात गस ऍटकिन्सन, विल जॅक्स, ऑली पोप आणि जेमी स्मिथ यांच्यासह सरेच्या अनेक खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळाले. बॅटी यांनी इंग्लंडसाठी नऊ कसोटी, १० एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. बॅटी यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये १,०९२ बळी घेतले आहेत. गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये सीएसकेला कठीण काळाला सामोरे जावे लागले आहे.
२०२३ मध्ये एमएस धोनीच्या पूर्णवेळ कर्णधार म्हणून शेवटच्या हंगामात विजेतेपद पटकावल्यापासून संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. २०२५ मध्ये शेवटच्या स्थानावर राहिल्यानंतर फ्रँचायझीने आपल्या रणनीतीचा पुनर्विचार केला आहे. गेल्या महिन्यात सीएसकेने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची आयपीएल २०२७ साठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्याने स्टीफन फ्लेमिंगची जागा घेतली आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी १६ वर्षे हे पद भूषवले होते. फ्रँचायझीला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली होती.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा झहीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होईल. कासी विश्वनाथन यांनी याला दुजोरा दिला. विश्वनाथन म्हणाले की, मोहित आमचा नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सीएसकेमध्ये सामील होईल. आमचा मुख्य प्रशिक्षक झहीर खानने त्याची शिफारस केली होती. मोहित आमच्यासाठी एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. आम्हाला आशा आहे की तो गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही उत्तम काम करेल.