
गुजरात टायटन्सला शुबमन गिल याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरातला 209 धावा करुनही जिंकता आलं नाही. गुजरातचा 15 व्या ओव्हरमध्ये पराभव झाला. गुजरातचा हा आयपीएल 2025 मधील तिसरा पराभव ठरला. राजस्थानच्या बॅटिंग दरम्यान शुबमनला पाठीच्या दुखापतीमुळे मैदानात येता आलं नाही. त्यामुळे शुबमनच्या जागी राशीद खान मैदानात आला. राजस्थानने सामना जिंकल्यानंतर शुबमनने प्रतिक्रिया दिली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी पावरप्लेमध्येच सामना हिसकावला. तसेच गुजरातच्या खेळाडूंनी खूप चुका केल्या, हे शुबमनने मान्य केलं.
वैभव आणि यशस्वीच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थानने पावरप्लेमध्ये बिनबाद 87 धावा केल्या. गुजरातला या दरम्यान विकेट घेण्याची संधी होती. मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे राजस्थानला विकेट मिळवता आला नाही. शुबमनने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. “त्यांनी आम्हाला पावरप्ले मध्येच सामन्यापासून दूर नेलं. याचं श्रेय त्यांना जातं. आम्ही 2-3 गोष्टी चांगल्या करु शकतो असतो. बाहेर बसून असं बोलणं सोपं असतं. मात्र सुरुवातीला आम्हाला विकेट घेण्याची संधी होती. आम्हाला टीम म्हणून एका बाजूवर काम करण्याची गरज आहे”, असं शुबमनने म्हटलं. गुजरातने राजस्थानच्या डावातील दुसर्या डावातच विकेट घेण्याची संधी गमावली. विकेटकीपर जोस बटलर याने डावातील दुसर्या ओव्हरमध्येच यशस्वी जयस्वाल याचा कॅच सोडला.
राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने या सामन्यात शतक ठोकून इतिहास घडवला. वैभवने अवघ्या 35 चेंडूत शतक केलं. वैभवने या खेळीत 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. वैभव 101 धावा करुन आऊट झाला. शुबमनला वैभवच्या खेळीबाबत विचारण्यात आलं. यावर शुबमन म्हणाला की, “वैभवचा आज दिवस होता. तो जोरदार फटकेबाजी करत होता. त्याने त्याच्या दिवसाचा पूर्णपणे फायदा केला”, असं शबमनने म्हटलं.
वैभवच्या शतकी खेळीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. वैभवने केलेल्या 101 धावांच्या खेळीमुळे राजस्थानाला 210 धावांचा आव्हान हे 2 विकेट्स गमावून 15.5 ओव्हरमध्ये पूर्ण करता आलं. वैभव व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रियान पराग या दोघांनीही विजयात योगदान दिलं. यशस्वीने 70 आणि रियानने
32 धावांची नाबाद खेळी केली.