
जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडायची. जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दित 704 विकेट घेत विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा जेम्स अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, विराट कोहली आणि जेम्स अँडरसन यांचं द्वंद्व सर्वश्रूत आहे. असं असताना जेम्स अँडरसनने विराट कोहलीबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचा हात कोणीच पकडू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे. अँडरसनने टेलेंडर्स पॉडकास्टशी बोलताना सांगितलं की, ‘मला नाही वाटत की, क्रिकेट इतिहासात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीपेक्षा चांगला कोणी फलंदाज आहे.’ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीचा मैदानात वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. संघाला पराभवाच्या दरीतून त्याने अनेकदा काढलं आहे. म्हणूनच त्याला रन चेज मास्टर ही उपाधी मिळाली आहे.
अँडरसनने सांगितलं की, ‘ऑस्ट्रेलियाचा मायकल बेवन 1990 आणि 2000 दशकाच्या सुरुवातीस संघासाठी प्रभावी फिनिशर होता. पण विराट कोहलीची शतकी खेळी त्याला त्याच्यापेक्षा व्हाइट बॉल फलंदाजांमध्ये एक महान फिनिशर ठरवते. कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना शतक ठोकतो. तर बेवन शेवटी खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. कोहली मोठी धावसंख्या उभारून संघाला विजय मिळवून देतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर, कोहलीपेक्षा बेस्ट फिनिशर आणि बेस्ट व्हाइट बॉल खेळणारा दुसरा खेळाडू नाही.’
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 166 सामन्यात 155 डावात 64.36 च्या सरासरीने आणि 93.6 च्या स्ट्राईक रेटने 7852 धावा केल्या आहेत. यात 27 शतकं आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये 54 सामन्यातील 48 डावात 67.10 च्या सरासरीने आणि 136.47 च्या स्ट्राईक रेटने 2013 धावा केल्या आहेत. या त्याने 20 अर्धशतकं ठोकली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विराट कोहलीने देशासाठी कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 533 सामने खेळले आहेत. यात 591 डावात त्याने 26942 धावा केल्या आहेत.कोहलीच्या नावावर 7 द्विशतक, 80 शतक आणि 140 अर्धशतकं आहेत.