
टीम इंडियाने साखळी फेरीत विजयी चौकार लगावत भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. मात्र सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं गणित फिस्कटलं आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतावर मोठ्या फरकाने मात केली. त्यामुळे आता भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपर 8 मधील उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडिया गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील दुसरा सामना हा झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी आयसीसीने 25 फेब्रुवारीला रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिगमध्ये टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूला किती फायदा झाला आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा याला त्याने केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली. मात्र अभिषेकने माती केली. अभिषेक सलग 3 सामन्यात झिरोवर आऊट झाला. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 फेरीतील सामन्यातही त्याला काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतरही अभिषेक टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. अभिषेकला अव्वल स्थान कायम राखण्यात त्याच्या मागील काही मालिकांमधील कामगिरीचा फायदा झाला आहे.
अभिषेकने अपवाद वगळता वर्ल्ड कपआधी झालेल्या टी 20I सामन्यांत अप्रतिम कामगिरी केलीय. अभिषेकने त्याच कामगिरीच्या जोरावर आपलं सिंहासन कायम राखण्यात यश मिळवलंय.
आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार, अभिषेकच्या खात्यात 877 रेटिंग पॉइंट्स आहेत. अभिषेकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 4 सामन्यांत एकूण 15 धावा केल्या. मात्र अभिषेकच्या क्रमवारीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अभिषेक व्यतिरिक्त रँकिंगमध्ये डावखुरा फलंदाज इशान किशन आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या दोघांनाही चांगला फायदा झाला आहे.
तसेच इशान किशन याने तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांना मागे टाकत 3 स्थानांची झेप घेतली आहे. इशान आठव्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. सूर्या सहाव्या स्थानी कायम आहे. तिलक चौथ्या स्थानावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
टी 20i चा ‘सिकंदर’, रझा नंबर 1 ऑलराउंडर
Zimbabwe skipper back at the top in the latest ICC Men’s T20I Player Rankings following his #T20WorldCup exploits 🔝
More from the update ⬇️https://t.co/3yXmryup9V
— ICC (@ICC) February 25, 2026
गोलंदाजांच्या क्रमवारीत मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने पहिलं स्थान कायम राखलंय. तसेच जसप्रीत बुमराह टॉप 10 मध्ये परतला आहे. बुमराहने मोठी झेप घेतली आहे. बुमराह 7 स्थानांची झेप घेत थेट आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या होत्या. बुमराहला त्या कामगिरीचा फायदा झाला आहे.