
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा करत टीम इंडियाच्या चाहत्यांना झटका दिला. त्यानंतर आता टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघातील दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या दिग्गजाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. अनुभवी फिरकीपटू पीयूष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. पीयूषने टीम इंडियाचं 3 कसोटी, 7 टी 20i आणि 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं.
पीयूषने टीम इंडियासाठी 3 कसोटी सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. वनडे क्रिकेटमधील 25 मॅचमध्ये 32 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर 7 टी 20i सामन्यांमध्ये 4 विकेट्स मिळवल्या. पीयूषला इतर खेळाडूंच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. पीयूष गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियापासून दूर होता. पीयूषने टीम इंडियासाठी डिसेंबर 2012 साली शेवटचा सामना खेळला होता.
पीयूष चावलाने आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. पीयूषने आयपीएलमधील 192 सामन्यांमध्ये एकूण 192 विकेट्स घेतल्या. पीयूषची 17 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच पीयूषने 92 डावांमध्ये 624 धावा केल्या. पीयूषने या दरम्यान 56 चौकार आणि 20 षटकार लगावले. केकेआरने 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. पीयूष त्या विजयी संघाचा भाग होता. पीयूषने त्या अंतिम सामन्यात विजयी फटका मारुन केकेआरला ट्रॉफी जिंकून दिली होती.
पीयूषने मुंबईसाठी केलेली कामगिरी
Piyush Chawla for Mumbai Indians
Matches- 28
Wickets- 36
Average- 26.8
Strike Rate- 16.7
Economy- 8.45Happy Retirement Legend 💙
Once a Mumbai Indian always a Mumbai Indian pic.twitter.com/4mWSkbgx0L— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) June 6, 2025
“दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर घालवल्यानंतर आता या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा भाग असण्यापर्यंत, या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण एका आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. या आठवणी माझ्या हृदयात नेहमीच राहतील. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आयपीएल संघांचे – पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स – मी मनापासून आभार मानतो”, असं म्हणत पीयुषने त्याच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला आणि आयपीएल फ्रँचायजींचे जाहीर आभारही मानले.