
अतिशय धक्कादायक आणि वाईट वृत्त समोर आलंय. 50 वर्षीय व्यक्तीचा क्रिकेट सामन्यादरम्यान दुर्देवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान बॉलिंग करताना या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संदीप सिक्का असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संदीप यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. हरयाणामधील रोहतक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक क्रिकेट वर्तुळात शोककला पसरली आहे. नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
दोन्ही संघात सामना सुरु होता. फलंदाजी करणाऱ्या संघाचा मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न होता. तर फिल्डिंग करणारी टीम या संघाला झटपट गुंडाळून रोखण्यासाठी प्रयत्नशील होती. संदीप बॉलिंग करत होते. संदीप बॉल टाकल्यानंतर मैदानात पडले आणि बेशुद्ध झाले. त्यामुळे खेळाडूंमध्ये खळबळ उडाली. सामना थांबवण्यात आला. संदीपचे मित्र तातडीने संदीपला रुग्णालयात घेऊन निघाले. मात्र तोवर उशीर झाला होता. संदीप यांचा त्याआधीच मृत्यू झाला होता. सोमवारी संदीप यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.
संदीप सिक्का एका खासगी कंपनीत कार्यरत होते. संदीप सुभाष नगरमधील एका कंपनीत काम करायचे. संदीप कट्टर क्रिकेटप्रेमी होते. त्यामुळे संदीप आणि त्यांचे मित्र रविवारी क्रिकेट खेळायला जायचे. त्यानुसार या रविवारीही ते आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेले. संदीप आणि त्यांचे मित्र रविवारी संध्याकाळी जींद रोडवरील एमएस सरस्वती स्कूलच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले.
दोन्ही संघांचे खेळाडू ठरले. टॉस झाला. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. संदीप यांनी संध्याकाळी जवळपास पावणे सहा दरम्यान आपल्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकला. संदीप बॉल टाकल्यानंतर मैदानात कोसळले. त्यानंतर मित्रांनी संदीप यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मित्रांनी संदीप यांना स्थानिक रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. संदीप यांच्यावर सोमवारी अंत्य संस्कार करण्यात आले.
“क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका येणं किंवा हृदय विकाराने मृत्यू होण्यामागे काही कारणं असू शकतात. अनुवांशिकता तसेच व्यायामादरम्यान हृदयावर पडणारा अतिरिक्त ताण हे कारण असू शकतं”, असं हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर आदित्य बतरा यांनी म्हटलं.
“बदललेली लाईफस्टाईल, वाढता ताण, उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्ट्रॉल यामुळे हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे”, असंही आदित्य बतरा यांनी म्हटलं.