
क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली आहे. भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती. मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. अमोल काळे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. अमोल काळे यांचं अवघ्या काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटकाने निधन झालं होतं.
अजिंक्य नाईक यांना शरद पवार गटाचा पाठिंबा होता.अजिंक्य नाईक यांनी 107 मतांची आघाडी घेत विजयी झाले आहेत. तर संजय नाईक यांना आशिष शेलार गटाचं समर्थन होतं. मात्र त्यानंतरही संजय नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आशिष शेलार गटासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आजच 23 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लागलीच निकाल जाहीर करण्यात आला. या पोटनिवडणुकसाठी एकूण 375 मतदार होते. मात्र त्यापैकी 335 मतदारांनी आपला हक्क बजावला. अजिंक्य नाईक यांनी या पोटनिवडणुकीत मताचं द्विशतक पूर्ण केलं. त्यांना एकूण 221 मतं मिळाली. तर संजय नाईक 114 मतांपर्यंतच पोहचू शकले.
अमोल काळे अध्यक्ष असताना अजिंक्य नाईक यांनी यशस्वीरित्या सचिवपदाची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. काळे यांनी मुंबई क्रिकेटसाठी अनेक आमूलाग्र बदल केले तसेच क्रांतीकारी निर्णय घेतले होते. त्यात अजिंक्य नाईक यांचंही मोठं योगदान होतं. आता अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले आहेत. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई क्रिकेटसाठी जेवढ्या करता येतील गोष्टी करता करणार”, असं अजिंक्य नाईक यांनी म्हटलं आहे.
अजिंक्य नाईक एमसीएचे सर्वात युवा अध्यक्ष
Heartiest Congratulations to Mr. Ajinkya Naik who has been elected as the President of the Mumbai Cricket Association in the MCA elections held today 👏#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI | @ajinkyasnaik pic.twitter.com/dXX6Ok64q4
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) July 23, 2024
दरम्यान एमसीएचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी अजिंक्य नाईक यांच्या विजयानंतर आनंद व्यक्त केलाय. पवार ग्रुपचा विजय झालाय. या विजयासह 20 वर्षांची पवार साहेबांची लेगसी कायम असल्याचं आव्हाड म्हणाले.