
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने मायदेशात 10 वर्षांनंतर इतिहास घडवला आणि क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपवली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने पराभूत करत बॉर्डर गावसकर ट्रॉफी उंचावली. या मालिकेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे मायदेशात परतल्यानंतर बीसीसीआयने रिव्हीव्यू मिटींग घेतली. त्या बैठकीत टीम इंडियाच्या खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानुसार रोहित 1 दशकानंतर मुंबईसाठी खेळला. रोहितला बीसीसीआयच्या आवाहनानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावं लागलं. त्यानंतर आता विराटवर तशी वेळ आली आहे.
रोहितनंतर आता विराट कोहली रणजी ट्रॉफीत खेळणार आहे. विराट देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व करतो. दिल्ली रणजी ट्रॉफीतील दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात रेल्वेविरुद्ध भिडणार आहे. हा सामना 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दिल्ली क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. त्यानुसार, आयुष बदोनी हा दिल्लीचं नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली याचीही निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने विराटचंही रोहितप्रमाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये 1 दशकानंतर पुनरागमन झालं आहे. विराटने अखेरचा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामना हा नोव्हेंबर 2012 साली उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता.
काही खेळाडू्ंचा अपवाद वगळता टीम इंडियाचे काही खेळाडू हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नव्हते. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर बीसीसीआय एक्शन मोडमध्ये आली. कॅप्ड खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने नसतील तेव्हा तब्येतीचं कारण वगळता देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. त्यानंतर रोहित मैदानात उतरला. मुंबईला जम्मू-काश्मीरने पराभूत केलं. मुंबई संघात अनुभवी खेळाडूंची फौज असूनही तुलनेत नवख्या संघाने गतविजेत्यांना पराभूत केलं.
रोहितने या सामन्यातील दोन्ही डावात निराशा केली. त्यानंतर आता विराटच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. विराटने बीजीटीमध्ये पर्थ कसोटीत शतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर विराटला धावा करता आल्या नाहीत. आता विराट अनेक वर्षांच्या कमबॅकनंतर झोक्यात सुरुवात करतो की रोहितसारखा इथेही अपयशी ठरतो? याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.
रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली क्रिकेट टीम : आयुष बदोनी (कॅप्टन), विराट कोहली, प्रणव राजवंशी (विकेटकीपर), सनत सांगवान, अर्पित राणा, मयंक गुसाई, शिवम शर्मा, सुमित माथुर, वंश बेदी (विकेटकीपर), मनी ग्रेवाल, हर्ष त्यागी, सिद्धांत शर्मा, नवदीप सैनी, यश धुळ , गगन वत्स, जोंटी सिद्धू, हिम्मत सिंह, वैभव कांडपाल, राहुल गहलोत आणि जितेश सिंह.