‘माझ्यासाठी हा वाईट दिवस, पण…’विराटच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्रींचं भावनिक टि्वट

| Updated on: Jan 15, 2022 | 9:46 PM

रवी शास्त्री आणि विराट यांच्या जोडगळीने कसोटी क्रिकेटमधील एक उत्तम संघ बांधला, ज्या संघाने परदेशातील खेळपट्टयांवर विजय मिळवले.

माझ्यासाठी हा वाईट दिवस, पण...विराटच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्रींचं भावनिक टि्वट
Follow us on

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक भावनिक संदेश पाठवला आहे. “व्यक्तिगत पातळीवर माझ्यासाठी हा वाईट दिवस आहे. जगातील एका यशस्वी कसोटी कर्णधाराचा आज आठ वर्षांचा कार्यकाळ संपला” असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

विराट कोहलीने शनिवारी तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका हरल्यानंतर त्याने राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. “विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी आणि कसोटी क्रिकेटमधील एक आक्रमक कर्णधार आहे” असं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

आपण दोघांनी मिळून…

“विराट मान उंच ठेव. तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलय. तू भारताचा सर्वात यशस्वी आणि आक्रमक कॅप्टन आहेस. माझ्यासाठी व्यक्तीगत पातळीवर हा वाईट दिवस आहे. ही टीम म्हणजे भारताचा ध्वज असून आपण दोघांनी मिळून हा संघ बांधला” असे रवी शास्त्रींनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धोनीने मध्यावर कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. 2014-15 च्या सीजनमध्ये विराट कॅप्टन बनला. त्यावेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून रवी शास्त्री ड्रेसिंग रुमचा भाग होते. 2015 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. पण अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री 2017 मध्ये पुन्हा भारतीय संघाचे हेड कोच बनले. रवी शास्त्री आणि विराट यांच्या जोडगळीने कसोटी क्रिकेटमधील एक उत्तम संघ बांधला, ज्या संघाने परदेशातील खेळपट्टयांवर विजय मिळवले.

(Ravi Shastri reacts to Virat Kohli stepping down as Test captain You can go with your head held high)