ऋषभ पंतने इंजिनिअर विद्यार्थ्यासाठी मदतीचा हात केला पुढे, पण घडलं भलतंच! प्रकरण समजून घ्या

ऋषभ पंत दिलदार मनाचा माणूस आहे. मदतीसाठी कायम तयार असतो. पण या दिलदार मनाच्या माणसासोबत फसवणूक झाल्याचं दिसत आहे. मदत म्हणून ऋषभ पंतनी हात पुढे केला. पण आता झालं असं की...

ऋषभ पंतने इंजिनिअर विद्यार्थ्यासाठी मदतीचा हात केला पुढे, पण घडलं भलतंच! प्रकरण समजून घ्या
| Updated on: Aug 27, 2024 | 8:27 PM

विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत मरणाच्या दारातून परतला आहे.30 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला आणि दीड वर्षे तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. अथक मेहनत घेत त्याने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलं. आयपीएल 2024 स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहून त्याची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली. श्रीलंका दौऱ्यातही ऋषभ पंत खेळला. दिल्ली प्रीमियर लीगनंतर दुलीप ट्रॉफीत खेळण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे ऋषभ पंत पुन्हा एकदा जुन्या रुपात परतला आहे. असं असताना ऋषभ पंत आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ऋषभ पंतसोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर एका युजर्सने कॉलेज फीसाठी ऋषभ पंतकडे मागणी केली होती. त्या पोस्टला पंतने सकारात्मक उत्तर दिलं होतं. आता ती पोस्ट डिलिट झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंतसोबत फसवणूक झाल्याचं सांगितलं जात आहे. पण यावर ऋषभ पंतने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कार्तिकेय नावाच्या एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने कॉलेज फीसाठी एका वेबसाईटवर क्राउड फंडिंगसाठी माहिती शेअर केली होती. कार्तिकेयने ही माहिती एक्स हँडलवर शेअर केली होती. यात ऋषभ पंतला टॅग केलं होतं. त्यावर पंतने उत्तर देत म्हणाला की, ‘तुमची स्वप्न पूर्ण करा. देवाकडे नेहमीच चांगली योजना असते.’ त्याच्या या उत्तरानंतर पोस्ट डिलिट झाली आहे. एका युजर्सने दावा केला आहे की, पंतने 90 हजार रुपये दिले. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

आता या प्रकरणात नेमकं काय झालं आहे हे ऋषभ पंतच सांगू शकतो. खरंच फसवणूक झाली असेल तर याबाबतची तक्रार पोलिसात दिली जाऊ शकते. तसेच फसवणूक केलेल्या व्यक्तीला पकडून या रॅकेटचा पदार्फाश करता येईल. त्यामुळे आणखी कोणाची अशी फसवणूक टाळली जाईल. नाहीतर खरंच गरजू असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही.