
मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. जवळपास दीड वर्षानंतर रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. पण वर्ल्डकप अंतिम फेरीचा सामना ते दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टेस्ट मालिका या मधील प्रवासात बरंच काही घडलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयपीएल 2024 स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या खांद्यावरील मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी टीकास्त्र सोडलं होतं. इतकंच काय तर एका दिवसात मुंबई इंडियन्सला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या कमी झाली होती. पण नववर्षात रोहित शर्माला पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली आहे. टी20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने कर्णधारपदाची धुराही त्याच्या खांद्यावर पडली आहे. टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने ही जबाबदारी खूपच महत्त्वाची मानली जाते. आता मुंबई इंडियन्सने ट्वीट करत 13 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागा केल्या आहेत.
रोहित शर्मा आजपासून 13 वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झाला होता. 8 जानेवारी 2011 साली रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघात आला होता. जवळपास 9 कोटींची रक्कम मोजून त्याला संघात घेतलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सने ट्वीट करत लिहिलं आहे की, “13 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रोहित शर्मा निळ्या सोनेरी रंगाच्या जर्सीत दिसला होता. ” त्याचबरोबर वन फॅमिली, मुंबई इंडियन्स असा हॅशटॅग टाकत रोहित शर्माला टॅग केलं आहे.
#OnThisDay, 13 years ago, Rohit turned Blue & Gold 💙#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/lHTIlB1vDr
— Mumbai Indians (@mipaltan) January 8, 2024
मुंबई इंडियन्सने असं ट्वीट करताच त्याखाली उत्स्फुर्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहे. अनेकांना या ट्वीटखाली आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला अशा पद्धतीने कर्णधारपदावरून काढणं शोभलं का? असं एका युजर्सने लिहिलं आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, हार्दिक पांड्या जखमी असल्याने आता मस्का मारला जात आहे. तर तिसऱ्या युजर्सने लिहिलं की, आता किती जवळीक साधण्याचा प्रयत्न तुटलेलं मन जुळून येणार नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा एक समीकरण तयार झालं होतं. पण हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपताच चाहते नाराज झाल्याचं दिसून येत आहे.