IPL 2026, MI vs DC : सामना सुरू असताना रोहित शर्माला मानाची ऑरेंज कॅप, झालं असं की..
IPL 2026 Orange Cap Holder: आयपीएल 2026 स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी हवी तशी झाली नाही. पण रोहित शर्माला मानाची ऑरेंज कॅप मिळाली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन ही जोडी मैदनात आली. पण संघाच्या 18 धावा असताना रयान रिकल्टन 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा काही खास करू शकला नाही. 2 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. संघावर दडपण आलं असताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 40 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 26 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 35 धावा केल्या. पण अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कव्हरच्या वरून फटका मारताना झेल बाद झाला. रोहित शर्माचा डाव फक्त 35 धावांवर आटोपला. पण त्याला या सामन्यात मानाची ऑरेंज कॅप मिळाली आहे. कसं काय ते जाणून घ्या.
रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. त्याने या सामन्यात 38 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार मारत 78 धावा केल्या होत्या. आता दिल्ली विरूद्धच्या सामन्यात 35 धावांची खेळी केली. या सामन्यात रोहित शर्माने 31 धाव घेतली आणि पंजाब किंग्सच्या कूपर कोनोलीला मागे टाकलं आणि मानाची ऑरेंज कॅप मिळवली. रोहित शर्मा आणि कूपर कोनोली यांच्यात फक्त 5 धावांचं अंतर आहे. तसं पाहिलं तर या सामन्यात रोहित शर्माच्या आसपास कोणी नाही. त्यामुळे सामना संपेपर्यंत हा कॅप डोक्यावर असेल यात काही शंका नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या समीर रिझवीने 70 धावा केल्या आहेत. पण रोहित शर्माचा पुढे जाणं कठीण दिसत आहे.
रोहित शर्माचा आणखी एक विक्रम
रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सर्वाधिक षटकार मारले आहे. यासह एकाच विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक षटकारांच्या यादीत तिसरं स्थान गाठलं आहे. या यादीत ख्रिस गेल आघाडीवर आहे. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 61 षटकार मारले आहेत. दुसऱ्या स्थानावरही ख्रिस गेल असून त्याने केकेआरविरूद्ध 54 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर असून त्याने दिल्लीविरूद्ध 51, धोनी चौथ्या स्थानावर असून आरसीबीविरूद्ध 50, विराट कोहली पाचव्या स्थानावर असून सीएसकेविरुद्ध 48 आणि रोहित शर्मा सहाव्या स्थानावर असून केकेआरविरूद्ध 47 षटकार मारले आहेत.