SA vs IND : संजू सॅमसनचं विस्फोटक शतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 203 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
South Africa vs India 1st T20I : संजू सॅमसन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला 200 पार मजल मारता आली. संजू टीम इंडियाकडून टी 20i क्रिकेटमध्ये सलग दुसरं शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी 20I सामन्यात विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने संजू सॅमसन याच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. संजूने 107 धावांची खेळी केली. संजूच्या टी 20i कारीकीर्दीतील हे एकूण आणि सलग दुसरं शतक ठरलं. संजू व्यतिरिक्त तिलक वर्मा याने 33 तर सूर्यकुमार यादव याने 21 धावा केल्या. टॉप ऑर्डरमधील या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक खेळी केल्याने मागील फलंदाजांना या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत अखेरीस फटकेबाजी करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला अखेरच्या क्षणी सातत्याने झटके दिले. हार्दिक पंड्या, रिंकु सिंह आणि अक्षर पटेल हे तिघेही स्फोटक बॅटिंग करुन फिनिशिंग टच देण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले.
टीम इंडियाची बॅटिंग
टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाने 16 धावांवर पहिली विकेट गमावली. अभिषेक शर्मा 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार 21 धावांवर बाद झाला. संजू आणि तिलक वर्मा या दोघांनी दोन्ही बाजूने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 77 धावा जोडल्या. त्यानंतर तिलक वर्मा 33 धावा करुन आऊट झाला. या दरम्यान संजूने टी 20i मध्ये सलग दुसरं शतक ठोकलं. मात्र संजूला शतकाचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. संजू 50 बॉलमध्ये 7 चौकार आणि 10 षटकारांसह 107 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे भारताची 15.4 ओव्हरमध्ये बाद 175 अशी स्थिती झाली.
दक्षिण आफ्रिकेने इथून टीम इंडियाच्या फलंदाजांना सलग झटके देत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. संजूनंतर हार्दिक, रिंकु आणि अक्षर या तिघांवर मोठी जबाबदारी होती. मात्र या तिघांना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गुंडाळला. हार्दिक पंड्या 2, रिंकु सिंह 11 आणि अक्षर पटेल 7 धावा करुन आऊट झाले. तर रवी बिश्नोईने 1 धाव केली. तर अर्शदीप सिंह 5 धावांवर नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून
गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन, पॅट्रिक क्रुगर आणि न्काबायोमझी पीटर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
संजूचा शतकी तडाखा, इंडिया 200 पार
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.