पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

स्कॉटलँडच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्याच सामन्यात वेगवान गोलंदाजाने इतके विकेट घेत विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणीच केली नव्हती. पहिल्याच षटकापासून गोलंदाजाने विक्रमाची नोंद करण्यास सुरुवात केली.

पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
| Updated on: Jul 22, 2024 | 9:40 PM

स्कॉटलँडमधील फोर्थिक क्रिकेट मैदानावर ओमान आणि स्कॉटलँड यांच्यात वनडे सामना रंगला. हा सामना स्कॉटलँडने 8 विकेट्सने जिंकला. नाणेफेकीचा कौल स्कॉटलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्कॉटलँडच्या पथ्यावर पडला. इतकंच काय तर वेगवान गोलंदाज चार्ली कॅस्सेलचं नशिब फळफळलं. चार्ली कॅस्सेलने पदार्पणाच्या सामन्यात 5.4 षटकं टाकली आणि यात 1 षटक निर्धाव टाकलं. इतकंच काय तर 21 धावा देत 7 गडी बाद केले. कॅस्सेलने आपल्या पहिल्याच सामन्यात केलेल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच काय पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद केली. यापूर्वी असा विक्रम कोणीच केला नव्हता. जे दिग्गज गोलंदाजांना जमलं नाही ते कॅस्सेलने करून दाखवलं. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात विकेट घेऊन केली. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो 32 वा गोलंदाज ठरला. इतकंच काय तर दुसऱ्या चेंडूवरही विकेट घेतली. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला. तसेच पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आणखी एक विकेट घेतली. चार्लीने पहिलं षटक निर्धाव टाकत एकूण 3 गडी बाद केले.

चार्लीने पहिल्या षटकात वर्ल्ड रेकॉर्ड थांबला नाही. त्याची भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन सुरुच होतं. 5.4 षटकं टाकत त्याने 7 गडी बाद केले. पदार्पणाच्या सामन्यात 7 गडी बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दोन गोलंदाजांनी प्रत्येकी 6-6 गडी बाद केले होते. चार्लीच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या नावावर होता. रबाडाने 2015 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होतं. तेव्हा त्याने 16 धावा दिल्या आणि 6 विकेट घेतल्या होत्या.

दरम्यान ओमानने 21.4 षटकात सर्व गडी गमवून 91 धावा केल्या आणि विजयासाठी 92 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान स्कॉटलँडने 17.2 षटकात 2 गडी गमवून पू्र्ण केलं. या सामन्यातील चमकदार कामगिरीसाठी चार्ली कॅस्सेलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. स्कॉटलँडकडून जॉर्ज मुन्सेने 23, चार्ली टीयरने 4, ब्रँडन मॅकमुलनने नाबाद 37 आणि रिची बेरिंग्टनने नाबाद 24 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

स्कॉटलंड (प्लेइंग इलेव्हन): जॉर्ज मुन्से, चार्ली टीयर, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्ज, जॅक जार्विस, चार्ली कॅस्सेल, गेविन मेन, ब्रॅडली करी.

ओमान (प्लेइंग इलेव्हन): आकिब इलियास (कर्णधार), प्रतीक आठवले (विकेटकीपर), करण सोनावले, झीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, शोएब खान, मेहरान खान, फय्याज बट, कलीमुल्लाह, बिलाल खान.