सानियाशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर

गेल्या काही महिन्यांपासून टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान आता थेट शोएबच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी त्याने निकाह केला आहे.

सानियाशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर
Shoaib Malik marries Pakistan actress
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 20, 2024 | 12:57 PM

लाहोर : 20 जानेवारी 2024 | टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. या चर्चांदरम्यान आता शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र दोघांनी त्याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. नुकतंच सानियाने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता शोएबने दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे. शोएब आणि सनाच्या डेटिंगच्या चर्चा आधीपासूनच होत्या. गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त शोएबने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या होत्या. सनासोबतचा फोटो पोस्ट करत त्याने ‘हॅपी बर्थडे बडी’ असं लिहिलं होतं. सना जावेदनंही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये हैदराबादमध्ये मुस्लीम पद्धतीने निकाह केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये वलिमा पार पडला होता. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएबचा मुलगा इझान आता पाच वर्षांचा आहे. घटस्फोटाबद्दल सानिया आणि शोएब यांनी मौन बाळगलं होतं. मात्र गेल्या वर्षी दुबईत दोघांनी मिळून मुलाचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता. त्यानंतर विभक्त झाल्याच्या चर्चा थंडावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमधून ‘सुपरवुमनचा पती’ हा शब्द काढून टाकला होता.

पहा फोटो

कोण आहे शोएब मलिकची दुसरी पत्नी?

सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी सौदी अरबमधील जेदाह याठिकाणी झाला. उर्दू टेलिव्हिजनवरील भूमिकांसाठी ती विशेष ओळखली जाते. कराचीतील विद्यापिठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2012 मध्ये तिने अभिनयात पदार्पण केलं. ‘खानी’, ‘रुसवाई’ आणि ‘डंक’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या आहेत. सनाचंही हे दुसरं लग्न आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये तिने गायक उमेर जस्वालशी निकाह केला होता. कराचीमधल्या घरीच दोघांनी गुपचूप निकाह केला होता.