
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा टाय झाला आहे. श्रीलंकेने विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 47.5 टीम इंडियाला ऑलआऊट 230 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला आहे. श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असालंका याने टीम इंडियाने जवळपास जिंकलेला सामना फिरवला आणि बरोबरीत सोडवला. टीम इंडियाला विजयासाठी 14 बॉलमध्ये फक्त 1 धावेची गरज होती. तेव्हा चरिथने 48 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर शिवम दुबे याला आऊट करत भारताला नववा झटका दिला. त्यानंतर अर्शदीप सिंह मैदानात आला. आता टीम इंडियाला 14 बॉलमध्ये 1 रन हवी असताना अर्शदीप मोठा फटका मारण्याचा नादात एलबीडब्ल्यू झाला. अशा प्रकारे चरिथने सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट भारताल ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाचा डाव हा 230 धावांवर आटोपला. सामना अशाप्रकारे बरोबरीत सुटला.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही शेवटपर्यंत टिकून भारताला सहज विजय मिळवून देता आला नाही. तर दुसऱ्या बाजूने श्रीलंकेने चिवट बॉलिंग करत गमावलेला सामना हा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता दोन्ही संघांना मालिका जिंकण्यासाठी पुढील सर्व अर्थात दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
दरम्यान टीम इंडियाकडून रोहितचा अपवाद वगळता शुबमन गिल 16, विराट कोहली 24, वॉशिंग्टन सुंदर 5, श्रेयस अय्यर 23, केएल राहुल 31, अक्षर पटेल 33, शिवम दुबे 25, कुलदीप यादवने 2 आणि मोहम्मद सिराज याने नाबाद 5 धावा केल्या. तर अर्शदीप सिंह आपल्या खेळीतील पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्य प्रयत्नात एलबीडबल्यू झाला आणि टीम इंडियाचा डाव आटोपला. श्रीलंकेकडून कॅप्टन चरिथ असालंका आणि वानिंदु हसंरगा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. दुनिथ वेल्लालगे याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर असिथा फर्नांडो आणि अकिला धनंजया या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
दरम्यान त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 8 विकेट्स गमावून 230 धावा केल्या. श्रीलंकेसाठी दुनिथ वेल्लालगे याने सर्वाधिक धावा केल्या. दुनिथने 65 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 67 रन्स केल्या ओपनर पाथुम निसांका याने 75 चेंडूत 56 धावांची खेळी केली. वानिंदु हसरंगा याने 24 आणि जनिथ लियांगे याने 20 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कुणाला वीशीपार जाता आलं नाही. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी 1-1 विकेट घेतली.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.