काल युतीची घोषणा, आज नाशिकच्या राजकारणात खळबळ, ठाकरे गटापाठोपाठ भाजपने मनसेचा मोठा नेता फोडला
मुंबईत काल उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा झाली. आज नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचं आज सकाळपासून नाशिकमध्ये ऑपरेशन लोटस सुरु आहे. उद्धव ठाकरे गट आणि मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काय घडतय? जाणून घ्या.

नाशिकच्या राजकारणात धक्कादायक नाही, आज सकाळपासून खळबळजनक घडामोडी घडत आहेत. काल मुंबईत वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या युतीची घोषणा झाली. त्यानंतर आज सकाळपासून नाशिकमध्ये ऑपरेशन लोट्स सुरु झालं आहे. दोन्ही ठाकरे बंधुंच्या पक्षाला भाजपकडून धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. आज सकाळी विनायक पांडे आणि यतीन वाघ हे भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपमधूनच विरोध होत आहे. नाशिक भाजप कार्यालयाबाहेर हाय वोलटेज ड्रामा सुरु आहे. म्हणून अजून त्यांचा पक्ष प्रवेश होऊ शकलेला नाही. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा नेता भाजपने फोडला आहे.
मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दिनकर पाटील हे मनसे सोडून भाजप प्रवेशासाठी निघाले आहेत. त्यांच्यासोबत तीन नगरसेवक आहेत. याच दिनकर पाटील कालपर्यंत नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. राज ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला होता. पण तेच दिनकर पाटील आज भाजपच्या वाटेवर आहेत. राजकारणात काहीही घडू शकत, हे शब्द आज सकाळपासून नाशिकमध्ये प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. खरोखरच राजकारणात एक चमत्कारिक रुप पहायला मिळतेय. विनायक पांडे जे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. ज्यांनी 43 वर्ष शिवसेनेत काढली. शिवसेना फुटल्यानंतरी उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यांनी तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘माझी मनसेत कोणावर नाराजी नाही’
तुम्ही मनसे का सोडताय? मनसेमध्ये तुम्ही कोणावर नाराज आहात का? हा प्रश्न दिनकर पाटील यांना विचारला. त्यावर त्यांनी ‘मी कुठेही नाराज नाही. मी विकासासाठी चाललो आहे’ असं उत्तर दिलं. ‘मी राज साहेबांवर नाराज नाही. मी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय’ असं उत्तर दिनकर पाटील यांनी दिलं. “मी मनसेच्या कोणत्याही माणसाला सोबत घेतलेलं नाही. माझी मनसेत कोणावर नाराजी नाही. राज ठाकरे यांना राजीनामा पाठवलाय” असं दीनकर पाटील म्हणाले. दीनकर पाटील मूळचे भाजपचे आहेत. लोकसभेच्यावेळी त्यांनी पक्ष सोडला. विधानसभेला राज ठाकरे यांनी त्यांना मनसेकडून उमेदवारी दिली. आता महापालिकेच्यावेळीत ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत आहे.
