
टीम इंडिया विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे. उभयसंघातील टी 20 मालिकेतील पहिला सामना हा 27 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या सीरिजसाठी कोलंबोत पोहचली आहे. चरिथ असलांका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर या दोघांनी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीय. तर गौतम गंभीर याने राहुल द्रविड यांची जागा घेतली आहे.
टीम इंडिया-श्रीलंका यांच्यात एकूण 3 टी 20 सामने होणार आहेत. या मालिकेनिमित्ताने उभयसंघांची टी 20 मालिकेत कशी कामगिरी राहिली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण 29 टी20i सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाच श्रीलंकेवर वरचढ राहिली आहे. भारताने श्रीलंकेवर 29 पैकी सर्वाधिक सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला 9 वेळा यशस्वी होण्यात यश आलं आहे.
दरम्यान या टी 20 मालिकेतून श्रीलंका संघात फलंदाज दिनेश चांदीमल याचं तब्बल 2 वर्षांनी पुनरागमन झालं आहे. चांदीमलने अखेरचा सामना हा 2022 साली खेळला होता. आता चांदीमलला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना,नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो.
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.