
दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलियावर अंतिम सामन्यात मात करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर 17 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या चौथ्या साखळीला सुरुवात झालीय. या साखळीतील पहिल्या मालिकेत श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळत आहे. तर गतविजेता दक्षिण आफ्रिका आता झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात 28 जून ते 10 जुलै दरम्यान 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कसोटी कर्णधार दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचं झिंबाब्वे विरुद्ध नेतृत्व करणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 चं विजेतेपद मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिका झिंबाब्वे विरुद्ध 28 जूनपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. मात्र त्याआधीच टेम्बाला दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेत दुखापतीमुळं खेळता येणार नसल्याची माहिती टीम मॅनेजमेंटकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. तसेच केशव टेम्बाच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
टीम मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार, टेम्बाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलदरम्यान दुखापत झाली होती. टेम्बाला बॅटिंग करताना त्रास जाणवत होता. मात्र त्यानंतरही टेम्बाने झुंजार खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र टेम्बाला त्या दुखापतीमुळे झिंब्बावे दौऱ्यात खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. टेम्बा या मालिकेआधी फिट होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. मात्र झिंबाब्वे विरुद्धची मालिका डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीचा भाग नसल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी चिंताजनक बाब नाही.
टेम्बा बावुमाचा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर
Proteas Men’s Test captain Temba Bavuma has been ruled out of the upcoming two-match Test series against Zimbabwe due to a left hamstring strain.
Bavuma sustained the injury while batting during South Africa’s second innings on day three of the ICC World Test Championship Final… pic.twitter.com/MW9dXrA4r2
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 20, 2025
झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेसाठी एडन मारक्रम आणि कगिसो रबाडा या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यात आता टेम्बा नाही. तर दुसऱ्या बाजूला लुंगी एन्गिडी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळणार आहे. झिंब्बावे दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत मजबूत टीम नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी तशी डोकेदुखी ठरणार नाही. त्यामुळे केशव कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो? याकडेही चाहत्यांचं लक्ष असेल. केशवने याआधी एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिका झिंबाब्वेनंतर पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली मालिका खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत भारतविरुद्ध कशी कामगिरी करते? हे पाहणंही औत्सुतक्याचं ठरणार आहे.