Odi Series : आशिया कपआधी वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, मोहम्मद शिराजला संधी नाहीच

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेआधी यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 ट्राय सीरिज होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यातील वनडे सीरिजसाठी टीम जाहीर केली आहे.

Odi Series : आशिया कपआधी वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, मोहम्मद शिराजला संधी नाहीच
Asia Cup
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Aug 21, 2025 | 11:18 PM

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी श्रीलंका क्रिकेट टीम झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका या दौऱ्यात वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. उभयसंघात 2 वनडे आणि 3 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेने झिंबाब्वे विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

चरिथ असलंका 16 सदस्यीय संघाचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीने आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या ईशान मलिंगा याला संधी दिली नाही. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज याचाही समावेश केलेला नाही. शिराजने 9 महिन्यांआधी श्रीलंकेसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. शिराज तेव्हापासून कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. शिराजने एकदिवसीय कारकीर्दीत एकूण 2 सामने खेळले आहेत. शिराजने 2 ऑगस्ट 2024 रोजी टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केलं होतं.

तसेच वानिंदु हसरंगा याला दुखापतीमुळे वगळण्यात आलं आहे. हसरंगाला जुलै महिन्यात टी 20i मालिकेत दुखापत झाली होती. हसरंगाला तेव्हा दुखापतीमुळे 3 सामन्यांच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर आताही हसरंगाला दुखापत आडवी आली. तर नुवानिदू फर्नांडो याचं कमबॅक झालं आहे.

टी 20I नंतर वनडे सीरिजचा थरार

श्रीलंका 22 ऑगस्टला झिंबाब्वे दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिकेनंतर 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या टी 20I मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केलेला नाही. मात्र वनडे संघातीलच बहुतांश खेळाडूंना टी 20I मालिकेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

झिंबाब्वे दौऱ्यातील वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम

श्रीलंका विरुद्ध झिंबाव्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 29 ऑगस्ट, हरारे

दुसरा सामना, 31 ऑगस्ट, हरारे

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 3 सप्टेंबर, हरारे

दुसरा सामना, 6 सप्टेंबर, हरारे,

तिसरा सामना, 7 सप्टेंबर, हरारे

झिंबाब्वे विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कप्तान), पाथुम निसंका, निशान मदुष्का, कुसल मेंडीस, सदीरा समरविक्रमा, नुवानिदु फर्नांडो, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानाज, पवन रथनायके, डुनिथ वेललेज, मिलन रथनायके, महीश तीक्षणा आणि जेफरी वंडारसे.