
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील प्रवास आता शेवटाच्या दिशेने होत आहे. सुपर 8 मध्ये आता सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळतेय. टीम इंडियाने सुपर 8 फेरीत अफगाणिस्तानवर विजय मिळवत जोरात सुरुवात केली. त्यानंतर आता टीम इंडिया सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशसाठी हा करो या मरो असा सामना आहे. बांगलादेशला सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता बांगलादेशसाठी हा महत्त्वाचा सामना आहे.
तर दुसऱ्या बाजूला एका संघाचं सेमी फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग झालं आहे. यजमान यूनायटेड स्टेट्सचा प्रवास जवळपास संपला आहे. यूएसएचा सुपर 8 मधील दुसरा सामना हा विंडिज विरुद्ध होता. विंडिजने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. यूएसएने विजयासाठी दिलेलं 129 धावांचं आव्हान विंडिजने 10.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं.यूएसएचा सुपर 8 मधील शेवटचा सामना हा 23 जून रोजी इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. विंडिजने मिळवलेल्या विजयामुळे इंग्लंडला यूएसए विरुद्धचा सामना हा नेट रनरेटनुसार जिंकावा लागणार आहे. त्यामुळे विंडिजने एका विजयासह यूएसएचा पत्ता कट केला. तसेच इंग्लंडचंही टेन्शन वाढवलंय.
ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया अजिंक्य आहे. दोन्ही संघांनी खेळलेल्या एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पहिल्या सामन्यात पराभव झालाय. तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेने 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. विंडिज आणि इंग्लंडने 1 सामना जिंकलाय तर 1 गमवलाय. तर यूएसए दोन्ही सामन्यात पराभूत झालीय.
अमेरिका प्लेइंग ईलेव्हन : आरोन जोन्स (कॅप्टन), स्टीव्हन टेलर, एंड्रीज गॉस (विकेटकीपर), नीतीश कुमार, कोरी एंडरसन, मिलिंद कुमार, हरमीत सिंह, शेडली वॅन शल्कविक, नोस्टुश केजिंगे, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.
वेस्टइंडीज प्लेइंग ईलेव्हन : : रोवमन पॉवेल (कॅप्टन), जॉनसन चार्ल्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेज, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि ओबेड मॅकॉय.