आई उशीरा आली म्हणून बनला क्रिकेटर, आता छापतोय लाखो रुपये; या क्रिकेटपटूची कहाणीच वेगळी
हैद्राबादचा लेफ्ट आर्म स्पिनर तनय त्यागराजन सध्या रणजी ट्रॉफीमध्ये चमकत आहे. आई उशिरा शाळेत आल्याने कोचने त्याला गोलंदाजी करायला सांगितले आणि तिथून त्याच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. 37 फर्स्ट क्लास सामन्यांत 170 बळी घेणाऱ्या तनयने नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यात 9 बळी घेत हैद्राबादला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्येही त्याची निवड झाली होती.

रणजी ट्रॉफी 2026-2027 सीजनचा पहिला विजय हैद्राबादला मिळाला आहे. हैद्राबादने त्रिपुराला डावासह 40 धावांनी पराभूत केलं. सीजनमध्ये विजय मिळवणारा हैद्राबाद हा पहिला संघ ठरला आहे. त्रिपुराने पहिल्या डावात केवळ 134 धावा केल्या. तर, हैद्राबादने पहिल्या डावात 294 धावा कुटल्या. दुसऱ्या डावात त्रिपुराने केवळ 120 धावा केल्या. त्यामुळे हैद्राबादने डावाने विजय मिळवला. त्यामुळे हैद्राबाद 7 गुण मिळाले आहेत. हैद्राबादच्या पहिल्यावहिल्या विजयाचे सर्व श्रेय तनय त्यागराजनला जातं. त्याने या सामन्यात 9 बळी घेतले. या सामन्याने हिरो ठरलेला तनय त्यागराजन आहे तरी कोण?
तनय त्यागराजनची क्रिकेटर बनण्याची कहाणी अत्यंत रोचक अशीच आहे. तनय हा हैद्राबादचा लेफ्ट आर्म स्पिनर आहे. 30 वर्षाच्या या खेळाडूने 37 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 170 बळी मिळवले आहेत. त्यात 12 वेळा पाच विकेट हॉल आणि दोन वेळा 10 विकेट हॉल त्याने घेतले आहेत. तनय हा योगायोगानेच क्रिकेटपटू झालाय. तो 8 वर्षाचा असताना कोलकाता येथे शिकत होता. एके दिवशी त्याची आई त्याला घ्यायला उशीरा शाळेत आली. यावेळी शाळेच्या कोचने तनयला गोलंदाजी करायला सांगितली. या संधीचा फायदा घेत तनयने अफलातून गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी पाहून कोच प्रचंड प्रभावित झाले. कोचच्या प्रोत्साहनामुळेच पुढे तनयचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.
तनयचे करिअर
2007मध्ये तनयच्या वडिलांची कोलकात्याहून हैद्राबादला बदली झाली. हैद्राबादमध्ये आल्यावरही तनयने क्रिकेट शिकणं सुरू ठेवलं. हैद्राबादेत मेंटॉर अभिजीत चटर्जी आणि कोच अदनान बाफना यांनी त्याच्या गोलंदाजीवर काम केलं. त्याने 2017मध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं. 2018-19मध्ये त्याने रणजीत पदार्पण केलं. त्याने पहिल्याच सीजनमध्ये पाच सामन्यात 17 विकेट घेतले. 2023-24मध्ये त्याने 7 सामन्यात 56 विकेट घेतले. त्यात सात वेळा फाइव्ह विकेट हॉल मिळवले. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सने त्याला 20 लाख रुपये घेऊन खरेदी केलं. पण त्याला मॅच खेळण्याची संदी मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा तो रणजी खेळत आहे. आता पुन्हा एकदा त्याने रणजीमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे.