
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रायपूरमध्ये दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. हा खेळाडू आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनचा भाग नसणार.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनआधी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. मोहित 10 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होता. त्यामुळे मोहित कधीतरी निवृत्ती घेणार असल्याचं निश्चितच होतं. मोहित टीम इंडियासाठी अखेरीस 2015 साली खेळला होता. त्यानंतर मोहित आयपीएल आणि इतर लीग स्पर्धेत खेळत होता. मात्र मोहितने लीग क्रिकेटमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना झटका लागला आहे.
मोहितने 2013 साली एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. मोहितने 1 ऑगस्ट 2013 रोजी झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं. तर मोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा शेवटचा ठरला. मोहित त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील अखेरचा सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 ऑक्टोबर 2015 रोजी खेळला होता. मोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25 डावांत 31 विकेट्स घेतल्या.
तसेच मोहितने 8 टी 20i सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. मोहितने या 8 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मोहितने आयपीएलमधील 120 सामन्यांमध्ये 134 विकेट्स घेतल्या होत्या.
मनाच्या अंतकरणाने मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर करत आहे. हरियाणाचं प्रतिनिधित्व करण्यापासून टीम इंडियाची जर्सी परिधान करणं आणि आयपीएलमध्ये खेळण्यापर्यंत, हा प्रवास कोणत्याही आशिर्वादापेक्षा कमी नाही”, असं मोहितने म्हटलं.
मोहितने निवृत्ती जाहीर करताना बीसीसीआयचेही आभार मानले. “माझ्या कारकीर्दीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या हरियाणा क्रिकेट असोसिएशनचा मी आभारी आहे. तसेच मला मार्गदर्शन करुन विश्वास दाखवणाऱ्या अनिरुद्ध सरांचा मी आभारी आहे”, असं मोहितने म्हटलं.
बीसीसीआय, प्रशिक्षक, सहकारी, आयपीएल फ्रँचायजी, सपोर्ट स्टाफ आणि सर्व मित्र या सर्वांची मी आभारी आहे. या सर्वांनी मला दिलेल्या पाठींबा आणि प्रेमासाठी मी त्यांचं आभार मानतो”, असं म्हणत मोहितने त्याच्या कारकीर्दीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.