Anshuman Gaekwad Death: टीम इंडियाचे माजी क्रिकेटर-प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी झुंज अपयशी, वयाच्या 71 व्या वर्षी निधन

Anshuman Gaekwad passed away: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक असलेले दिग्गज अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरु होते.

Anshuman Gaekwad Death: टीम इंडियाचे माजी क्रिकेटर-प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी झुंज अपयशी, वयाच्या 71 व्या वर्षी निधन
anshuman gaekwad death
| Updated on: Aug 01, 2024 | 1:01 AM

क्रिकेट विश्वातून या क्षणाची अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं आहे. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. बुधवारी 31 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड लंडनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ब्लड कॅन्सवर उपचार घेत होते. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली होती. मात्र अखेर त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. ते 71 वर्षांचे होते. गायकवाड यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

अंशुमन गायकवाड यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बीसीसीआय सचिव जय शाह आणि आजी माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. “अंशुमन गायकवाड यांचे क्रिकेटमधील योगदान स्मरणात राहील. ते एक हुशार खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.”, असं मोदींनी म्हटलं. तसेच इतर आजी माजी खेळाडूंनी शोक व्यक्त करत अंशुमन गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

गायकवाड यांची क्रिकेट कारकीर्द

अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 असे एकूण 12 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं. गायकवाड भारताकडून 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीत 1 द्विशतक, 2 शतकं आणि 10 अर्धशतकांसह 1 हजार 985 धावा केल्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 अर्धशतकासह 269 धावा केल्या. गायकवाड यांनी 206 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 12 हजार 136 धावा केल्या. तसेच 143 विकेट्स घेतल्या. त्यांनी विंडिज विरुद्ध इडन गार्डनमध्ये 17 डिसेंबर रोजी कसोटी पदार्पण केलं. तर 7 जून 1975 साली लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमध्ये वनडे डेब्यू केलं.

अंशुमन गायकवाड यांचं निधन

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते 2 वेळा टीम इंडियाचे हेड कोच राहिले. गायकवाड यांनी 1997 ते 2000 या दरम्यान 2 वेळा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात अनिल कुंबळे पाकिस्तान विरुद्ध एकाच डावात 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तसेच सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांची धुलाई करत भारताला कोको कोला कप जिंकून दिला होता.