Team India : टीम इंडियाचे चॅम्पियन होताच 3 वर्ल्ड रेकॉर्ड, सूर्याच्या नेतृत्वात भारताची ऐतिहासिक कामगिरी

Icc T20 World Cup 2026 Team India World Record : टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर एकतर्फी विजय मिळवून टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. भारताने यासह इंग्लंड-वेस्ट इंडिजला पछाडून एकूण 3 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

Team India : टीम इंडियाचे चॅम्पियन होताच 3 वर्ल्ड रेकॉर्ड, सूर्याच्या नेतृत्वात भारताची ऐतिहासिक कामगिरी
Ishan Kishan And Suryakumar Yadav Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 09, 2026 | 12:24 AM

क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची 7 फेब्रुवारीपासून प्रतिक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या या विजयात प्लेइंग ईलेव्हनमधील 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या महाअंतिम सामन्यातील विजयाचे हिरो ठरले. संजूने केलेल्या स्फोटक 89 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 255 धावा केल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने न्यूझीलंडला सर्वाधिक 4 झटके देत 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर रोखलं. भारताने अशाप्रकारे हा सामना 96 धावांनी जिंकला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने असे 3 वर्ल्ड रेकॉर्ड करुन दाखवले जे आतापर्यंत कोणत्याही संघाला करणं जमलं नाही. टीम इंडियाने नक्की काय काय केलं? जाणून घेऊयात.

इंग्लंड-विंडीजचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही इतिहासातील तिसरी वेळ ठरली. भारताने यासह इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांना मागे टाकलं. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने संयुक्तरित्या सर्वाधिक 2 वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता.

तसेच टीम इंडियाने यजमान म्हणून ऐतिहासिक कामगिरी केली. याआधी कोणत्याही गतविजेत्या संघाला यजमान म्हणून टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी कायम राखता आली नव्हती. टीम इंडियाने 2024 साली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड चॅम्पियन होण्याच मान मिळवला होता. त्यामुळे भारतासमोर यंदा वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान होतं. मात्र भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन या स्पर्धेच्या इतिहासात जे कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं.

सर्वाधिक 3 टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी

टीम इंडियाची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण तिसरी वेळ ठरली. यासह भारत अशी कामगिरी करणारा या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच संघ ठरला. टीम इंडियाने 2007 साली पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवत पहिल्याच झटक्यात टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. त्यानंतर भारताला 17 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. भारताने 2024 साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ही प्रतिक्षा संपवली. त्यानंतर आता सूर्यकुमार यादव याने रोहितचा वारसा कायम राखत भारताला त्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन केलं. भारताने यासह सर्वाधिक 3 वेळा टी 20i वर्ल्ड चॅम्पियन होण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

Follow Us