Test Championship Final 2025 : या दोन मालिका ठरवणार टीम इंडियाचं अंतिम फेरीचं गणित, जाणून घ्या

भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या शर्यतीत आहे. पण दोन मालिकांमधील कामगिरी भारताचं भवितव्य ठरवणार आहे. दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड संघाविरोधातील कामगिरी भारताचं भविष्य ठरवणार आहे. चला जाणून घेऊयात भारताचं टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठीचं गणित कसं ते

Test Championship Final 2025 : या दोन मालिका ठरवणार टीम इंडियाचं अंतिम फेरीचं गणित, जाणून घ्या
Test Championship Final 2025 : टीम इंडिया तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणार! कसं ते समजून घ्या
| Updated on: Nov 24, 2023 | 9:08 PM

मुंबई : टीम इंडियाला गेल्या दहा वर्षात आयसीसी चषकात चमकदारी कामगिरी करण्यात अपयश आलं आहे. अनेकवेळा हातातोंडाशी असलेला घास गमवावा लागला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. 6 गडी राखून भारताचा पराभव केला. तर टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दोनदा पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्यांदा न्यूझीलंडने, तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. पराभवातून धडा घेत टीम इंडिया पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टेस्ट चॅम्पियन्सशिप 2023-2025 स्पर्धेत चांगली कामगिरी करत जेतेपद जिंकण्याची संधी आहे. टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या रेसमध्ये टीम इंडिया आघाडीवर आहे. दोन मालिकांवर भारतीय संघाचं अंतिम फेरीचं स्वप्न असणार आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर पाकिस्तान आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ड्रॉ झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान झालं आहे. पाच सामन्यांची मालिका 2-2 ने ड्रॉ झाली. त्याचा थेट फायदा भारत आणि पाकिस्तानला झाला आहे. विजयी टक्केवारीमुळे दोन्ही संघांना फायदा झाला आहे. आता टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन आणि इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 27-30 डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी, 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. ही कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेत होणार आहे.

इंग्लंडचा संघ पाच सामन्याची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 पाच कसोटी सामने खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन मालिकांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. या दोन्ही मालिकांमध्ये व्हाईट वॉश देण्यात टीम इंडियाला यश मिळालं तर टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग आणखी सोपा होणार आहे.

या दोन मालिकेनंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. भारतीय संघ पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. मागच्या मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच धरतीवर पराभवाचं पाणी पाजलं होतं.

  • भारत विरुद्ध बांगलादेश (दोन सामने) सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (तीन सामने) ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पाच सामने) नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025