
भारताचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने 2026 वर्षातील सलग दुसऱ्या सामन्यात यशस्वीरित्या धमाका सुरु ठेवलाय. विराटने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार खेळी केली. विराटने रविवारी 11 जानेवारीला 93 धावांची खेळी केली. विराटचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. मात्र विराटने या खेळीत 2 खास कारनामे केले. विराटची ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याची सलग पाचवी वेळ ठरली. तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 28 हजार धावा करत सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा या दोघांना मागे टाकलं. विराटने आता त्यानंतर बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये सचिनचा आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे.
विराट पहिल्या वनडेत 93 धावांवर बाद झाला. विराटने यासह भारताकडून न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनच्या सर्वाधिक धावांची बरोबरी केली होती. त्यामुळे विराटला दुसऱ्या सामन्यात सचिनला मागे टाकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज होती. विराटने राजकोटमध्ये आपल्या खेळीतील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत सचिनचा महाविक्रम आपल्या नावावर केला. विराटने यासह सचिनच्या नावावर असलेला सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. विराट यासह न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंग याच्या नावावर आहे.
विराटला राजकोटमधील या सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र विराट त्या खेळीला अर्धशतकात बदलण्यात अपयशी ठरला. विराटने 29 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 चौकार लगावले.
रिकी पाँटिंग, 51 सामने :1 हजार 791 धावा
विराट कोहली, 35 सामने : 1 हजार 773 धावा
सचिन तेंडुलकर, 42 सामने : 1 हजार 750 धावा
सनथ जयसूर्या, 47 सामने : 1 हजार 519 धावा
दरम्यान विराट 14 जानेवारीला धमाका केला. विराटने रोहित शर्मा याला मागे टाकत आयसीसी वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. विराटने यासह पावणे 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2021 नंतर पहिल्यांदा आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला.