Virat Kohli : कोहलीची पहिल्याच सामन्यात विराट कामगिरी, सचिनचा रेकॉर्ड उद्धवस्त
Virat Kohli Record : विराट कोहली याने न्यूझीलंड आणि 2026 वर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांची खेळी केली. विराटने या खेळीत 8 फोर आणि 1 सिक्स लगावला. विराटने 93 धावांच्या खेळीसह भारताला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली.

बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करत 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 301 धावांचं आव्हान भारताने 6 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताच्या या विजयात अनुभवी फलंदाज विराट कोहली याने प्रमुख भूमिका बजावली. विराट कोहली याने भारतासाठी 93 धावांची खेळी केली. विराटचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकली. मात्र विराटने न्यूझीलंड विरूद्धच्या या सामन्यात इतिहास घडवला. विराटने या खेळीदरम्यान महारेकॉर्ड केला. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने यासह माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला.
विराटची विजयी खेळी, चाहत्यांची मनं जिंकली
टीम इंडियाने 301 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा याच्या रुपात पहिली विकेट गमावली. रोहितला सुरुवात चांगली मिळाली मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहितने 26 धावा केल्या. रोहित आऊट होताच विराटची मैदानात त्याच उत्साहाने एन्ट्री झाली. विराटकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आणि नेहमीप्रमाणे फटकेबाजीची आशा होती. विराटने चाहत्यांना अपेक्षित खेळी केली. विराटने मैदानात येताच मोठे फटके मारले. विराटने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. न्यूझीलंडच्या गोटात अपवाद वगळता युवा गोलंदाज आहेत. विराटने त्याचा पूर्ण फायदा घेतला.
विराटकडून सचिनचा रेकॉर्ड ब्रेक
विराटने 13 व्या षटकात फिरकीपटू आदित्य अशोकच्या बॉलिंगवर दुसऱ्यांदा चौकार लगावला. विराटने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराटच्या खेळीतील हा सहावा चौकार ठरला. विराटने अवघ्या 20 चेंडूत 6 षटकार लगावले. विराटने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार धावा पूर्ण केल्या.
विराट यासह 28 हजार धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. विराटआधी सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा या दोघांनीच 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र विराट सचिन आणि संगकारापेक्षा सरस ठरला आहे. विराटने डावांनुसार वेगवान 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. विराटने 624 डावांत ही कामगिरी केली होती. तर सचिनने 644 व्या आंतरराष्ट्रीय डावात 28 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
कुमार संगकाराचा रेकॉर्ड ब्रेक
विराटने या 93 धावांच्या खेळीसह श्रीलंकेचा माजी विकेटकीपर कर्णधार कुमार संगकारा याला मागे टाकलं. विराट संगकाराला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने 42 वी धाव पूर्ण करताच कुमार संगराकाराची या यादीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली. संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 हजार 16 धावा केल्या होत्या. तर सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34 हजार 357 धावा केल्या आहेत.
