
सनरायजर्स हैदराबाद टीमचा काल आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये पराभव झाला. शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमने दणदणीत विजय मिळवला. फायनल सामना फायनल सारखा वाटलाच नाही. केकेआरने SRH वर अगदी एकतर्फी विजय मिळवला. विजयासाठी दिलेले 114 धावांचे लक्ष्य 57 चेंडू आणि आठ विकेट राखून पूर्ण केलं. बऱ्याच वर्षांनी हैदराबादची टीम फायनलमध्ये आली होती. इथवरच्या प्रवासात सनरायजर्स हैदराबाद टीमने अनेक मोठ्या टीम्सवर एकतर्फी विजय मिळवले होते. पण फायनलमध्ये त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. हैदराबाची मुख्य भिस्त फलंदाजांवर अवलंबून होती. अभिषेक शर्मा (2), ट्रेव्हीस हेड (०), राहुल त्रिपाठी (9), क्लासेन (16) हे मुख्य फलंदाज काहीच करु शकले नाहीत. परिणामी हैदराबादचा डाव 18.3 ओव्हर्समध्येच 113 धावांवर आटोपला. हे लक्ष्य केकेआरने आरामात पार केलं.
एकाबाजूला केकेआरच्या विजयानंतर शाहरुखच कुटुंब जल्लोष करत होतं. त्याचवेळी SRH ची मालकीण काव्या मारनच्या डोळ्यात अश्रू होते. प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये बसून काव्या मारन टीमला चिअर करताना दिसायची. त्याच काव्या मारनच्या डोळ्यात काल अश्रू होते. काव्या मारनच्या या अश्रुंना त्यांच्या SRH टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स जबाबदार आहे. कारण पॅट कमिन्सने चुकीचे निर्णय घेतले. त्याने स्वत:च्याच नाही, टीमच्या पायावर कुऱ्हाड मारली. फायनलमध्ये कमिन्सने टॉस जिंकलेला. त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरला. टॉस हरल्यानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर म्हणालेला की, मी जर टॉस जिंकलो असतो, तर गोलंदाजी घेतली असती. कारण पहिल्या इनिंगमध्ये विकेट गोलंदाजीसाठी अनुकूल होती.
त्याला का संपूर्ण सीजन खेळवलं नाही?
कमिन्सने विकेट नीट समजून घेतली नाही. टॉस जिंकताच फलंदाजीचा निर्णय घेऊन आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारली. कमिन्सने या पूर्ण सीजनमध्ये न्यूझीलंडचा स्पिनर, ऑलराऊंडर ग्लेन फिलिप्सला खेळवलं नाही. हा धाकड प्लेयर शानदार फॉर्ममध्ये होता. फिलिप्सने आयपीएल आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये 5 विकेट घेतले होते. फिलिप्सने ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्येही बॅटने जोरदार प्रदर्शन केलं होतं. SRH ने कमिन्सला लिलावात 20.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं होतं. कमिन्स आतापर्यंतचा आयपीएलमधला सर्वात महागडा कॅप्टन आहे.