गौतम गंभीरला भारतीय संघाचा कोच का केलं? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

गौतम गंभीरची भारतीय संघाचा नवा प्रशिक्षण म्हणून निवड झाली आहे. गौतम गंभीर याचं नाव बऱ्याच दिवसापासून चर्चेत होते. अखेर याला पूर्णविराम मिळाला आहे. गौतम गंभीरकडे आता भारतीय संघाचा जबाबदारी असणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्याने गौतम गंभीर याची निवड करण्यात आली आहे.

गौतम गंभीरला भारतीय संघाचा कोच का केलं? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं
| Updated on: Jul 09, 2024 | 8:28 PM

टीम इंडियाला नवा कोच मिळाला आहे. गौतम गंभीर हा भारतीय संघाचा नवा कोच असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम गंभीरच्या नावाची चर्चा होती. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. गौतम गंभीरने यंदाची लोकसभा निवडणून न लढवण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याचं नाव भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी आघाडीवर होते.

जय शाह यांनी X वर घोषणा करत म्हटले की, भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आधुनिक क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या काळाला जवळून पाहिले आहे. संपूर्ण कारकिर्दीत अडचणींचा सामना केल्याने आणि विविध भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी केल्याने, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी योग्य व्यक्ती आहे.’

गौतम गंभीरने 4 डिसेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. गौतम गंभीरने भारतासाठी शेवटची 2016 मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. गंभीरने 58 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये नऊ शतकांचा समावेश आहे.

गंभीरने 147 वनडे सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळलेल्या 97 धावांच्या संस्मरणीय खेळीचाही यात समावेश आहे, ज्यामुळे भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. एकदिवसीय सामन्यात त्याने 11 शतकी खेळी खेळली आहे. गंभीरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपली छाप सोडली. त्याने 37 सामन्यात सात अर्धशतकांच्या मदतीने 932 धावा केल्या आहेत.