
मुंबई | टीम इंडियाला आता जुलै महिन्यात वेस्टइंडिजचा दौरा करायचा आहे. टीम इंडिया या दौऱ्यामध्ये आगामी वनडे वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीने उतरणार आहे. टीम इंडियाला विंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूची एन्ट्री होणार आहे. हा खेळाडू गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतो. चेन्नई 16 व्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकून पाचव्यांदा चॅम्पियन ठरली. चेन्नईला विजयी करण्यात या खेळाडूने निर्णायक भूमिका बजावली.
सध्या हा खेळाडू महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत खेळतोय. हा खेळाडून पुणेरी बाप्पा टीमचं नेतृत्व करतो. आपण बोलतोय ते ऋतुराज गायकवाड याच्याबाबत. ऋतुराज गायकवाड याची विंडिज दौऱ्यासाठी निवड होऊ शकते. ऋतुराजला आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीचं फल मिळू शकतं.
आयपीएल 16 वा मोसम नुकताच पार पडला. ऋतुराजने या 16 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 16 सामन्यांमध्ये 42.14 च्या एव्हरेजने 590 धावा केल्या. ऋतुराजने या 14 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकं ठोकली. त्यामुळे आता निवड समिती ऋतुराजचा विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विचार करते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, निवड समिती विंडिज दौऱ्यासाठी शुबमन गिल याला टी 20 मालिकेसाठी विश्रांती देऊ शकते. शुबमन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळतोय. त्यामुळे शुबमन याच्या जागी सिलेक्टर्स ऋतुराज याला संधी देऊ शकते.
ऋतुराजने 1 वनडे आणि 9 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. ऋतुराजने टीम इंडियासाठी 28 जुलै 2021 रोजी टी 20 आणि 6 ऑक्टोबर 2022 रोजी एकदिवसीय पदार्पण केलं होतं. ऋतुराजने टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी एकमेव अर्धशतकासह 135 धावा केल्या आहेत. तर एकमेव वनडे सामन्यात 19 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाच्या या विंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 5 मॅचची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे.