WI vs NEP : विंडीजचा 10 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात दोन्ही पराभवांचा हिशोब, नेपाळला हॅटट्रिकपासून रोखलं

West Indies vs Nepal 3rd T20I Match Result : सलग 2 सामन्यांसह मालिका गमावणाऱ्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या अंतिम सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत लाज राखली.

WI vs NEP : विंडीजचा 10 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात दोन्ही पराभवांचा हिशोब, नेपाळला हॅटट्रिकपासून रोखलं
Ackeem Auguste and Amir Jangoo WI vs NEP 3rd T20I
Image Credit source: Windies Cricket X Account
| Updated on: Oct 01, 2025 | 1:37 AM

वेस्ट इंडिज टीमने नेपाळ विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात दणदणीत विजय मिळवत पहिल्या 2 पराभवांची अचूक परतफेड केली आहे. नेपाळने विंडीजला विजयासाठी 123 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडीजच्या सलामी जोडीनेच हे आव्हान तुफानी बॅटिंगच्या जोरावर पूर्ण केलं. विंडीजने हे आव्हान 46 बॉलआधीच पूर्ण केलं. विंडीजने 12.2 ओव्हरमध्ये 123 धावा केल्या आणि नेपाळ विरुद्ध यशस्वीरित्या क्लिन स्वीप टाळला. नेपाळने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली.

विंडीजसाठी अमीर जांगू आणि अकीम ऑगस्टे या सलामी जोडीने नेपाळच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत पहिल्या 2 पराभवांचा राग काढला. या दोघांनी मैदानात बेछूट आणि चौफेर फटकेबाजी केली. विंडीजसाठी अमिरने सर्वाधिक धावा केल्या. अमिरने 45 बॉलमध्ये 164.44 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 74 रन्स केल्या.  अमिरने 11 बॉलमध्ये फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 56 रन्स केल्या. अमिरने या खेळीत 6 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकार लगावले. तर अकीमने 29 बॉलमध्ये 141.38 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 41 रन्स केल्या. अकीमने या खेळीत 4 फोर आणि 2 सिक्स लगावले. तर नेपाळकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र एकालाही विंडीजची सलामी जोडी फोडण्यात यश आलं नाही.

विंडीजची बॉलिंग आणि नेपाळ ढेर

त्याआधी वेस्ट इंडिजने टॉस जिंकून नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजच्या गोलंदाजांनी नेपाळला 1 बॉलआधी 125 धावांच्या आत ऑलआऊट केलं. विंडीजने नेपाळला 19.5 ओव्हरमध्ये 122 रन्सवर रोखलं. नेपाळसाठी कुशल भुर्टेल याने सर्वाधिक धावा केल्या. कुशलने 29 बॉलमध्ये 134.48 च्या स्ट्राईक रेटने 39 रन्स केल्या. कुशलने या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोर लगावले.

कुशल मल्ला, कॅप्टन रोहित पौडेल, गुलशन झा आणि सुंदीप जोरा या चौघांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. कुशल मल्ला, कॅप्टन रोहित पौडेल, गुलशन झा आणि सुंदीप जोरा या चौघांनी अनुक्रमे 12, 17, 10 आणि 14 धावा केल्या. विंडीजसाठी रॅमन सिमंड्स याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. जेदाह ब्लेड्स याने दोघांना आऊट केलं. तर अकील हौसेन आणि जेसन होल्डर दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

नेपाळचा ऐतिहासिक मालिका विजय

दरम्यान पहिले 2 सामने जिंकून ही मालिका आपल्या नावावर केली होती. त्यामुळे नेपाळला तिसरा सामना जिंकून विंडीजला 3-0 ने क्लिन स्वीप करुन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी कामगिरी करण्याची संधी होती. मात्र विंडीजने तसं होऊ दिलं नाही. असं असलं तरी नेपाळ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा मालिका विजय अनेक वर्ष लक्षात राहिल इतकं मात्र नक्की.