Women T20 World Cup 2024: टीम इंडियाच्या एका सामन्याच्या तारखेत बदल, पाहा वेळापत्रक

Womens India Schedule T20i World Cup 2024: आयसीसीने काही वेळेपूर्वी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. टीम इंडियाच्या एका सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. पाहा वेळापत्रक.

Women T20 World Cup 2024: टीम इंडियाच्या एका सामन्याच्या तारखेत बदल, पाहा वेळापत्रक
shreyanka patil and harmanpreet kaur
Image Credit source: bcci
| Updated on: Aug 26, 2024 | 11:14 PM

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 26 ऑगस्ट रोजी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या अराजकतेमुळे आता या स्पर्धेंचं आयोजन हे यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ खेळणार आहेत. स्पर्धेतील 10 संघांमध्ये 18 दिवसांत 23 सामने खेळवण्यात येणार आहेत. शारजाह आणि यूएई येथे हे सामने होणार आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 3 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात बांगलादेश-स्कॉटलँड आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर 17 आणि 18 ऑक्टोबरला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने होणार आहेत.

स्पर्धेतील सहभागी एकूण 10 पैकी 8 संघांनी थेट प्रवेश मिळवला. तर स्कॉटलँड (क्वालिफायर 2) आणि श्रीलंका (क्वालिफायर 1) या दोन्ही संघांनी क्वालिफायरमध्ये विजय मिळवून प्रवेश मिळवला. स्कॉटलँड ग्रुप बीमध्ये आहेत. त्यांच्यासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा समावेश आहे. तर ए ग्रुपमध्ये श्रीलंकेसह, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि टीम इंडियाचा समावेश आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 4 सामने खेळणार आहे. टीम इंडियाच्या एका सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.

टीम इंडिया याआधीच्या वेळापत्रकानुसार तिसरा सामना हा 8 ऑक्टोबर रोजी खेळणार होती. मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार टीम इंडियाचा हा सामना 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्याने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करणार आहे. तर टीम इंडियाचा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचं आणि दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा सामना हा 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

टीम इंडियाचं वेळापत्रक

विरुद्ध न्यूझीलंड, 4 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

विरुद्ध पाकिस्तान, 6 ऑक्टोबर, दुपारी 3.30, दुबई

विरुद्ध श्रीलंका, 9 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 13 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, शारजाह

टीम इंडिया साखळी फेरीतील सामन्याआधी 2 सराव सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर पहिल्या साखळी सान्यात विंडिज तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया पहिला सराव सामना हा 29 सप्टेंबर तर दुसरा सामना हा 1 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे.