
मुंबई : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या जेतेपदासाठी लढणार आहेत. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्या नेतृत्वात दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. एक विजय आणि जेतेपदावर नाव कोरलं जाणार आहे. भारताला तिसऱ्यांदा, तर ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी आहे. दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील सुरुवातीचे सामने गमवल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. तर भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.त्यामुळे अंतिम फेरीत कोणताही संघ सहजासहजी सामना जिंकणार नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विजयाची चिन्हं अधिक असतात हे नाकारू शकत नाही.
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल. कारण खेळपट्टी वेळेनुसार स्लो होत जाते आणि नंतर फलंदाजी करणं कठीण होतं. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करत 315-350 धावा केल्यास दबाव टाकणं सोपं होईल. यामुळे गोलंदाजांना मदत होईल. अंतिम फेरीत दबावाची रणनिती जेतेपदाच्या जवळ घेऊन जाईल. तसेच विरोधी संघाचं मनोधैर्य खचू शकतं. पिच क्यूरेटरनेही पीटीआयशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांना 315 धावा केल्या तर ही धावसंख्या करणं नंतर कठीण आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये साखळी भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं होतं. तर भारताने ही धावसंख्या 30.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केली होती.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, एडम झाम्पा.