IND vs AUS Final: मैदानातील उपस्थित 1.3 लाख प्रेक्षकांचा आवाज करणार बंद, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दिला इशारा
अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माइंड गेम सुरु झाला आहे. समोरच्या संघ आणि प्रेक्षकांना डिवचून लक्ष विचलीत करणं हे ऑस्ट्रेलियन संघाचं जुनं कारस्थान आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने भारतीय प्रेक्षकांची बोलती बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विजयी घोडदौड सुरु केली होती. आता जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर आहे. विजय मिळवताच तिसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळणार आहे. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान आहे. या मैदानात 1.3 लाख लोकं एकाचवेळी सामना पाहू शकतात. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी हे मैदान खचाखच भरलं असेल यात शंका नाही. 99 टक्के प्रेक्षक भारतीय सपोर्टर असणार आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन संघाने आतापासून माइंडगेम खेळण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स भारतीय प्रेक्षकांना आवाज बंद करू इच्छित आहे. तसेच खेळपट्टीबाबतही अजब वक्तव्य केलं आहे.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
“मला वाटतं की, प्रेक्षकवर्ग भारताच्या बाजूने असणार आहे यात शंका नाही. शेवटच्या सामन्यात इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांना गप्प करणं. मनाला शांती देण्यासारखं असेल. उद्या आमचं हेच लक्ष्य असेल. अंतिम फेरीत प्रत्येक संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. खूप आवाज असेल. खूप लोकं असतील. पण यासाठी आम्ही तयार आहोत. जे काही होईल ते चांगलंच होईल. पश्चाताप न होता हा दिवस घालवायचा आहे. आम्ही भारतात बरंच क्रिकेट खेळलो आहोत. यासाठी आवाज आमच्यासाठी नवीन बाब नाही.”, असं ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला.
“मला वाटते की आमचा अनुभव पहिल्यापेक्षा चांगला आहे. पण त्यात काही बदल झालेला नसेल. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवेल. डेविड वॉर्नर डान्स करून प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. तर अन्य खेळाडू आपल्या बबलमध्ये राहतील.”, असंही पॅट कमिन्स पुढे म्हणाला. भारत न्यूझीलंड सामन्यात याची प्रचिती आली होती. मधल्या षटकांमध्ये मिचेल आणि विल्यमसनने चांगलाच घाम फोडला होता. तेव्हा मैदानात भयाण शांतता पसरली होती. शमीने विकेट घेताच उपस्थितांचा जीव भांड्यात पडला आणि कल्लोळ सुरु झाला.
खेळपट्टीबाबत पॅट कमिन्स याने स्पष्ट भूमिका मांडली. दोन्ही संघांना सारखंच पिच असणार आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही. नाणेफकही महत्त्वाची नसेल. जसं पिच असेल तसं आम्ही खेळण्यास सज्ज असू, असंही पॅट कमिन्स म्हणाला.
