मोहालीत कब्बडी प्लेयर राणा बलाचौरिया यांना जीवे मारलं, बंबीहा गँगने घेतली जबाबदारी
मोहालीत कबड्डीपटू राणा बलाचौरिया याची एका स्पर्धेदरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी बंबीहा गँगने स्वीकारली आहे. इतकंच काय तर सिद्धू मूसेवालाच्या हल्लेखोरांची साथ दिल्याचं सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील सोहाना कस्बेत एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बेदवान स्पोर्ट्स क्लबच्या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेत सोमवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत स्पर्धेचे आयोजन कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बलाचौरिया यांचा मृत्यू झाला आहे. कबड्डी स्पर्धेदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन-तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली. राणा बालचौरिया यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार-पाच गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राणा बलाचौरिया स्वत: एक कबड्डीपटू आहे आणि त्यांनी बेदवान स्पोर्ट्स क्लबमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं. दरम्यान, एक खेळाडू या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी खेळाडू रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी बंबीहा गँगने स्वीकारली आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.
बंबीहा गँगचे गोपी घनश्यामपुरिया याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘मी, डोनिबल, सगनप्रीत, मोहब्बत रंधावा, अमर खाब्बे, प्रभदासवाल आणि कौशल चौधरी आज मोहालीतील कबड्डी कप दरम्यान राणा बालचौरियाच्या हत्येची जबाबदारी घेतो. या माणसाने जग्गू खोती आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यासोबत आमच्याविरुद्ध काम केले. त्याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांना वैयक्तिकरित्या हाताळले.’
“आज, राणा बालचौरियाला मारून, आम्ही आमचा भाऊ सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा बदला घेतला. हे काम आमचे भाऊ मक्खन अमृतसर आणि डिफॉल्टर करण यांनी केले. आजपासून, मी सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो. कोणीही जग्गू आणि हॅरीच्या संघात खेळू नये. अन्यथा, असेच परिणाम भोगावे लागतील. आम्हाला कबड्डीची कोणतीही ऍलर्जी नाही. आम्हाला फक्त जग्गू आणि हॅरीच्या कबड्डीमध्ये कोणताही हस्तक्षेप नको आहे. वेट अँड वॉच.”
पंजाबमध्ये अलिकडेच अनेक कबड्डी खेळाडूंवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे दहशतीचं वातावरण आहे.2025 मध्येच सहा महिन्यांत तीन कबड्डी खेळाडूंची हत्या करण्यात आली. यामध्ये सोनू नोल्टा (जूनमध्ये हत्या), तेजपाल सिंग (ऑक्टोबरमध्ये हत्या) आणि आता राणा बालचौरिया यांचा समावेश आहे. या घटनांनंतर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी या हत्येसाठी आप सरकारला जबाबदार धरले.
