युती म्हणजे काय सोयरिक आहे का? राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीवर सदावर्तेंची बोचरी टीका!
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BMC Election : राज्यात आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महापालिकेचा निवडणूक कार्यक्रमदेखील इतर महापालिकांसोबतच असणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जाहीर होताच आता राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचीदेखील चांगलीच चर्चा चाल आहे. याच युतीवर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत ठाकरे बंधुंचा समाचार घेतला आहे.
लोकाशाहीचा उत्सव चालू झाला
महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने मुंबईकरांसमोर एक संधी आली आहे. आपल्या लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे, असे म्हणत जास्तीत जास्त नागरिक या मध्ये सहभाग घेतील अशी अपेक्षा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली.
राज, उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावर यावेळी मतदान होणार नाही
विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला असा दावा केला जातो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसा दावा केला आहे. याच मुद्द्यावर बोलताना सदावर्ते यांनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बोलण्यावर मतदान होणार नाही. मुंबईकरांच्या विकासासाठी मतदान होईल. मुंबईच्या राजकारणाचा चेहरा नव्हे तर पूर्ण गणितच यावेळी बदललेले आहे. ही लोकांच्या मनातली गोष्ट आहे. सेल्फ डेवलपमेंट किंवा ओसी नसलेल्या घरांचा प्रश्न असेल, यावर महायुती काम करत आहे. सिडकोच्या घरांची किंमत दहा टक्क्यांनी कमी झालेली आहे, असे मत सतावर्ते यांनी व्यक्त केले.
युती म्हणजे काय…
पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा वैचारिक डीएनए लोकांनी पहिला आहे. ते दम येईपर्यंत माझे मनसैनिक असे म्हणतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चालणारे गणित नाही. ते सखे भाऊ नव्हेत. ते चुलत भाऊ आहेत. युती काय सोयरीक आहे का? दोघांकडे पण काहीच नाहीये, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला.
