
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील (WPL 2026) चौथ्या मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शुक्रवारी 9 जानेवारीला मुंबईवर शेवटच्या चेंडूवर मात करत सनसनाटी विजय मिळवला. आरसीबीला 155 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी शेवटच्या 4 बॉलमध्ये 18 रन्सची गरज होती. नॅडीन डी क्लार्क हीने फटकेबाजी करत आरसीबीला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. त्यानंतर आता मुंबईसमोर सलग दुसऱ्या दिवशी या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान आहे. मुंबईसमोर हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान आहे. तर दिल्ली गतविजेत्या मुंबईला पराभूत करुन विजयाचं खातं उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात या सामन्यात कोण मैदान मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या मोसमात मुंबईच्या विरोधात सलग दुसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल लागला आहे. मुंबईला आरसीबीनंतर दिल्ली विरुद्ध टॉस गमवावा लागला आहे. जेमिमाह रॉड्रिग्स या नवनियुक्त कर्णधाराने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता पलटण दुसऱ्या सामन्यात ती चूक सुधारणार की पुन्हा गुडघे टेकणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबईने या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. साईका इशाक हीच्या जागी त्रिवेणी वशिष्ठ हीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
दिल्लीने टॉस जिंकला, मुंबईची बॅटिंग
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals elect to bowl against @mipaltan
Updates ▶️ https://t.co/aVKBHVKp7c #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvDC pic.twitter.com/6FfRT5aWLY
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 10, 2026
दरम्यान मुंबईकडून आरसीबी विरुद्ध या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात जी कामालिनी, कॅप्टन हरमनप्रीत कौर, निकोला कॅरी आणि सजीवन सजना या चौघींव्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे इतर फलंदाज आपली कामगिरी सुधारणार का? हे पहिल्या डावानंतर स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : अमेलिया केर, जी कामालिनी (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, पूनम खेमनार, त्रिवेणी वसिष्ठ, शबनीम इस्माईल आणि संस्कृती गुप्ता.
वूमन्स दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, लिझेल ली (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान काप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा.