
टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. तर त्यानंतर आयसीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाचा दिग्गज विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा निवृत्त झाला आहे. बंगालकडून खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाचा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पंजाबविरुद्धचा सामना हा अखेरचा ठरला. बंगाल टीमने ऋद्धीमानला विजयी निरोप दिला. बंगाल विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना हा ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला. सामन्यानंतर साहाला सहकाऱ्याकडून अविस्मरणीय निरोप देण्यात आला. साहाने निवृत्तीनंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भलीमोठी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मी 1997 साली पहिल्यांदा क्रिकेट मैदानात पाऊल ठेवलं होतं, त्याला आता 28 वर्ष झाली आणि हा अप्रतिम प्रवास राहिला. देश, राज्य, जिल्हा, क्लब, विश्वविद्यालय, कॉलेज आणि शाळेचं प्रतिनिधित्व करणं हे माझ्या जीवनातील सर्वात सन्मानजनक बाब आहे”, असं साहाने म्हटलं.
“आज मी जो काही आहे, आयुष्यात जे काही मिळवलंय, मी शिकलेला प्रत्येक धडा, या सर्वांचं श्रेय या अद्भूत खेळाला देतो. क्रिकेटने मला आनंदाचे क्षण, अविस्मरणीय विजय आणि अमूल्य अनुभव दिले आहेत. क्रिकेटने माझी कसोटीही घेतलीय आणि त्याचा सामना कसा करायचा हे देखील शिकवलंय”, असं म्हणत साहाने त्याच्या जीवनावर असलेल्या क्रिकेटच्या प्रभावाबाबत सांगितलं.
“चढ उतार, विजय-पराजयाने या प्रवासात मला तसं घडवलंय जो मी आज आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट होतोच, त्यामुळे मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही साहाने म्हटलं. साहाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना हा 2021 साली न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. साहा महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीनंतर 2014 पासून आणि ऋषभ पंतच्या डेब्यूआधी टीम इंडियाचा नियमित सदस्य होता.
साहाला त्याच्या अखेरच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. साहाला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तसेच बंगालने डावासह सामना जिंकल्याने दुसर्या डावात बॅटिंगची संधीही मिळाली नाही. बंगालने पंजाबवर 1 डाव आणि 13 धावांनी विजय मिळवला. साहाला सामन्यानंतर सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेतलं.
साहाने निवृत्तीनंतर काय करणार? याबाबतही सांगितलंय. “आता आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. आता स्वत:ला कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी समर्पित करण्याची वेळ आहे. मी ते क्षण जगायचे आणि अनुभवायचे आहेत जे क्रिकेटमुळे शक्य होऊ शकलं नाही”, असं साहाने म्हटलं.
साहाने निवृत्तीनंतर कुटुंबाचे, क्रिकेटमधील इथवरच्या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकाचे, खेळाडूंचे, टीम मॅनेजमेंटचे आभार मानले.
ऋद्धीमान साहाचा क्रिकेटला अलविदा
Thank You, Cricket. Thank You everyone. 🙏 pic.twitter.com/eSKyGQht4R
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) February 1, 2025
ऋद्धीमान साहा याने टीम इंडियाचं 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. तसेच साहाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्रिपुरा आणि बंगालकडून खेळताना एकूण 142 फर्स्ट क्लास आणि 116 लिस्ट ए सामने खेळले. साहाने त्याच्या कारकीर्दीत एकूण 16 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या.