
प्रत्येक सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2025 चं समीकरण बदलतंय. शनिवारी 30 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत केलं. त्यानंतर रविवारी 1 डिसेंबरला इंग्लंडने ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. या पराभवासह न्यूझीलंडच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याच्या मोहिमेला जबर धक्का बसला. न्यूझीलंडचं या पराभवामुळे wtc 2023-2025 पॉइंट्स टेबलमधील पीसीटी 50.00 इतकं झालं आहे. न्यूझीलंडने आता इंग्लंडविरुद्धचे 2 सामने बाकी आहेत. मात्र हे सामने जिंकले तरी न्यूझीलंडचं स्वत:च्या जोरावर wtc final मध्ये पोहचणं अशक्य झालं आहे.
त्यामुळे आता wtc फायनलच्या शर्यतीत टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे 4 संघ आहेत. मात्र या 4 संघांमध्ये 2 जागांसाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेविरुद्ध 1 आणि पाकिस्तान विरुद्ध 2 असे एकूण 3 सामने जिंकायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. 4 संघांची सध्याची स्थिती आणि त्यांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी काय करावं लागेल? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. टीम इंडियाचे पीसीटी पॉइंट्स 61.11 इतके आहे. टीम इंडियाला BGT ट्रॉफीतील कसोटी मालिकेत आणखी 4 सामने खेळायचे आहेत.भारताने सर्व 4 सामने जिंकल्यास पीसीटी पॉइंट्स 69.29 इतके होतील. तसेच उर्वरित 4 पैकी 3 सामने जिंकले आणि 1 सामना बरोबरी राहिल्यास पीसीटी पॉइंट्स 65.79 इतके होतील. तसेच न्यूझीलंडने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला असता तर त्यांचे पीसीटी पॉइंट्स हे 64.29 इतके झाले असते, मात्र आता ते शक्य नाही.
दक्षिण आफ्रिका 59.25 पीसीटी पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेने शनिवारी 3 स्थानांची झेप घेतली आणि दुसऱ्या स्थानी पोहचली. दक्षिण आफ्रिकेला आता एकूण 3 सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेने तिन्ही सामने जिंकल्यास पीसीटी पॉइंट्स 69.44 इतके होतील. दक्षिण आफ्रिकेसाठी अंतिम फेरीत पोहचण्यासाठी इतके पीसीटी पॉइंट्स पुरुसे आहेत. कारण ऑस्ट्रेलियाच पीसीटी पॉइंट्सबाबत दक्षिण आफ्रिकेला पछाडू शकते. दक्षिण आफ्रिकेने 3 पैकी 1 सामने जिंकले आणि 1 सामना बरोबरीत राहिला तर पीसीटी पॉइंट्स 63.89 इतके होतील. तर 2 विजय आणि 1 पराभव झाला तर पीसीटी पॉइंट्स 61.11 इतके होतील.
ऑस्ट्रेलिया 57.69 पीसीटी पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाला WTC 2023-2025 या साखळीत आणखी 6 सामने खेळायचे आहेत. कांगारुंनी पैकीच्या पैकी सामने जिंकले तर त्यांचे पीसीटी पॉइंट्स 71.05 इतके होतील. 5 सामने जिंकल्यास पीसीटी पॉइंट्स 64.29 इतके होतील. असं झालं तर दक्षिण आफ्रिकाच त्यांच्या पुढे असेल. तसेच जर टीम इंडियाने BGT मालिका 3-2 ने जिंकली, त्यानंतरही ऑस्ट्रेलिया पुढे असेल. मात्र असं तेव्हाच होईल जेव्हा ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध मालिका 2-0 फरकाने जिंकतील. असं झाल्यास ऑस्ट्रेलियाचे पीसीटी पॉइंट्स 60.53 इतके होतील, जे त्या क्षणी टीम इंडियाच्या 58.77 पीसीटीपेक्षा अधिक असतील.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात पराभूत केल्यानं श्रीलंकेचं समीकरण फार अवघड झालंय. ताज्या आकडेवारीनुसार श्रीलंकेचे पीसीटी पॉइंट्स हे 50 आहेत. श्रीलंकेने उर्वरित 3 सामने जिंकले तर पीसीटी पॉइंट्स 61.54 इतके होतील. अशा परिस्थितीत श्रीलंका शर्यतीत कायम राहिल, मात्र त्यांना स्वबळावर अंतिम फेरीसाठी पात्र होता येणार नाही. श्रीलंकेला 61.54 पीसीटी पॉइंट्सपर्यंत पोहचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 आणि ऑस्ट्रेलियाला 2 सामन्यात पराभूत करावं लागेल, जे फार अवघड आहे. श्रीलंका या शर्यतीत असणार की नाही हे 9 डिसेंबरपर्यंत निश्चित होईल.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी आणखी रंगत वाढली
Exciting changes in the standings as the race to the #WTC25 Final heats up 🤩
More ➡ https://t.co/5lIuiKChEe pic.twitter.com/cyWgptbq5I
— ICC (@ICC) December 1, 2024
इंग्लंडने पहिल्या सामन्यात पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचं WTC Final च्या स्पर्धेतील आव्हान जवळपास संप्षुटात आलं आहे. न्यूझीलंडचे या साखळीतील 2 सामने बाकी आहेत. न्यूझीलंडने हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे पीसीटी पॉइंट्स हे 57.14 इतके होतील. हे पीसीटी पॉइंट्स अंतिम फेरीत पोहचण्यासाठी पुरेसे ठरणं अवघड आहे. त्यामुळे न्यूझीलंड स्वबळावर अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे.