
भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये त्याचं लग्न होणार होतं. दोघांचही कुटुंबं रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाच्या तयारीत अतिशय व्यस्त होती. पण आता अशी बातमी समोर आली आहे की रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. एवढेच नाही तर दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारीही थांबवली आहे. असं नेमकं का झालं याचं कारण जाणून घेऊया.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकामागून एक षटकार मारणाऱ्या रिंकू सिंगला भारतीय संघात स्थान मिळाले आणि आता तो संपूर्ण भारताचा लाडका आहे. सपा खासदार प्रिया आणि रिंकू सिंह यांचा या महिन्यात साखरपुडा झाला. लखनौमधील एका हॉटेलमध्ये शानदार समारंभात त्यांनी एकमेकांना अंगठीही घातली. तर येत्या काही महिन्यांत म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न होणार होते, परंतु सध्या लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. रिंकू सिंहचे क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रक असून त्यामुळेच लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे कारण सांगितले जात आहे.
अजून तारीख निश्चित नाही
क्रिकेट टूर्नामेंटमुळे रिंकू आणि प्रिया यांचं लग्न पोस्टपोन करण्यात आले आहे. रिंकूच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लग्न काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचे लग्न होणार होते. मात्र आता नोव्हेंबरची तारीख पोस्टपोन केल्यावर सध्या फेब्रुवारीच्या अखेरीस हॉटेल बुक करण्यात आले आहे. मात्र असं असलं तरीही त्यांच्या लग्नाची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. फेब्रुवारी महिन्यात हॉटेल बूक केल्यामुळ नवीन वर्षात, 2026 मध्येच त्यांचं लग्न होईल असं सांगितलं जात आहे.
कशी सुरू झाली प्रेमकहाणी ?
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची प्रेमकहाणी सुमारे 4 वर्षांपूर्वी दिल्लीत सुरू झाली. केकेआरच्या एका सहकाऱ्याने रिंकूची प्रियाशी ओळख करून दिली. त्यांची मैत्री झाली आणि कालांतराने त्यांचे नाते प्रेमात बदलले जे आता आयुष्यभराच्या बंधनात बदलले आहे. प्रियाने साखरपुड्यानंतरचे फोटो शेअर केले होते. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेला हा क्षण मौल्यवान आहे, असं तिने लिहीलं होतं. त्यांच्या साखरपुड्याला फक्त क्रीडा क्षेत्रातील नव् तर राजकारणातीलही अनेक दिग्गज आले होते.