
क्रिकेटमध्ये पारदर्शकता वाढली असली तरीही मॅच फिक्सिंग होत असल्याचे समोर आले आहे. आता श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला आहे. श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीगच्या २०२० च्या हंगामात सचित्रा सेनानायकेवर एका सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी आमिष दाखवल्याचा आरोप झाला होता, त्यानंतर त्याला अटकही झाली होती, मात्र २०२३ मध्ये त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर सेननायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला असल्याचे समोर आले आहे. आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हंबनटोटा न्यायालयाने सेनानायकेला ठरवले दोषी
२०२० मध्ये झालेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये श्रीलंकेचा माजी फिरकीपटू सचित्रा सेनानायकेवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. आपोपानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता चौकशी पूर्ण झाल्यावर हंबनटोटा उच्च न्यायालयाने त्याला मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवले आहे. सेननायकेने सहकारी खेळाडूला आमिष दाखविल्याचे सिद्ध झाले आहे.
न्यायालयाने दिली महत्वाची माहिती
हंबनटोटा उच्च न्यायालयाच्या अॅटर्नी जनरल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले की, ‘श्रीलंकेत लागू असलेल्या भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत ही चौकशी सुरु होती. सेननायकेविरुद्ध मॅच फिक्सिंगसाठी हा पहिलाच आरोप होता. त्याने कोलंबो किंग्जकडून खेळणाऱ्या थरिंदू रत्नायकेला फिक्सिंगची ऑफर दिली होती. याप्रकरणी तो दोषी आढळला आहे.’
सेनानायके श्रीलंकेच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य
श्रीलंकेच्या संघाने २०१४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती, सचित्रा सेनानायके त्या संघाचा महत्वाचा भाग होता. ४० वर्षीय सेनानायकेने २०१२ ते २०१६ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, त्याने ४९ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले. यामध्ये, त्याने एकदिवसीय सामन्यात ५३ बळी घेतले, आणि टी-२० मध्ये एकूण २५ बळी घेतले.
आयपीएलमध्ये केकेआरचा होता भाग
२०१३ च्या आयपीएल हंगामात सचित्रा सेननायकेला कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा भाग होता. सचित्राने आयपीएलमध्ये एकूण ८ सामने खेळताना २३.२२ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या होत्या, मात्र २०१३ च्या हंगामानंतर त्याला रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कधीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.