भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या नावात बदल, आता ‘या’ दोन दिग्गजांच्या नावाने मालिका खेळली जाणार

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर खेळवण्यात येणारी कसोटी मालिका पूर्वी पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती, मात्र आता हे नाव बदलण्यात आले आहे. या मालिकेचे नवीन नाव काय आहे ते जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या नावात बदल, आता या दोन दिग्गजांच्या नावाने मालिका खेळली जाणार
| Updated on: Jun 05, 2025 | 10:10 PM

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. आता या कसोटी मालिकेचे नाव बदलण्यात आले आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर खेळवण्यात येणारी कसोटी मालिका पूर्वी पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती, मात्र आता हे नाव बदलण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ईसीबीने पतौडी कुटुंबाला एक पत्र लिहून ही ट्रॉफी निवृत्त करत असल्याची माहिती दिली होती. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेला एक नवीन नाव देण्यात आले आहे. हे नाव जागतिक क्रिकेटमधील दोन महान खेळाडू, सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर असणार आहे.

तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने दीर्घकाळ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवलेले आहे. तसेच जेम्स अँडरसनने वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवेले आहेत. या दोघांच्या सन्मानार्थ भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिका आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे. या ट्रॉफीचा पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले मैदानावर होणार आहे.

अँडरसनने सचिनला सर्वाधिक वेळा केलंय बाद

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत जेम्स अँडरसनविरुद्ध एकूण 14 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये जेम्स अँडरसनने सचिनला सर्वाधिक वेळा म्हणजेच ९ वेळा बाद केले आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनचे एकूण ३५० चेंडू खेळले आहेत ज्यामध्ये त्याने २३.११ च्या सरासरीने २०८ धावा केल्या आहेत. सचिनने २६० डॉट बॉलचा सामना करताना अँडरसनच्या चेंडूंवर ३४ चौकार मारले.

सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत सचिन तेडुलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिनने कसोटीत १५९२१ धावा केल्या आहेत, त्याच्या नावावर कसोटीत ५१ शतके झळकावलेली आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत जेम्स अँडरसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण ७०४ बळी घेतले आहेत. आता या दोघांच्या नावाने ही मालिका खेळवली जाणार आहे.